फोटो सौजन्य - Social Media
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना आता शारीरिक शिक्षण व क्रीडा मार्गदर्शन मिळणार आहे. शालेय शिक्षण विभागाने केंद्रशाळा स्तरावर क्रीडा शिक्षक पदांना मंजुरी दिली असून, राज्यभरात एकूण ४ हजार ८६० क्रीडा शिक्षकांची पदे निर्माण करण्यात आली आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे.
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या शिक्षक संवर्गातील २ लाख ३६ हजार २२८ पायाभूत (प्राथमिक) पदे निश्चित आहेत. २१ ऑगस्ट २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार समूह साधन केंद्रांची (केंद्रशाळा) पुनर्रचना करण्यात आली होती. त्यानुसार सध्या राज्यात ४,८६० समूह साधन केंद्रे कार्यरत आहेत. दरम्यान, १५ मार्च २०२४ रोजी संचमान्यतेचे निकष सुधारित करण्यात आले. या नव्या निकषांनुसार प्रत्येक केंद्रशाळेच्या स्तरावर एक क्रीडा शिक्षक पद मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे “केंद्रस्तरीय विशेष शिक्षक (क्रीडा)” असा स्वतंत्र संवर्ग तयार करण्यात आला असून, त्यामध्ये एकूण ४,८६० पदांचा समावेश आहे. आतापर्यंत बहुतांश प्राथमिक शाळांमध्ये स्वतंत्र क्रीडा शिक्षक उपलब्ध नव्हते. परिणामी विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण, व्यायाम, खेळांचे तांत्रिक मार्गदर्शन मिळण्यात अडचणी येत होत्या. मात्र, या निर्णयामुळे केंद्रशाळा स्तरावरून किमान मार्गदर्शन उपलब्ध होणार असून, शाळांमधील क्रीडा संस्कृतीला चालना मिळणार आहे.
या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवर क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असून, जिल्हानिहाय पदसंख्या निश्चित करण्यात आली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार सर्वाधिक ३६० क्रीडा शिक्षक पुणे जिल्ह्याला मिळणार आहेत. शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे की, १८ ऑक्टोबर २०२४ च्या निर्णयानुसार केंद्रस्तरीय विशेष शिक्षक (दिव्यांग विद्यार्थी अध्यापन) या संवर्गातील पायाभूत पदांची मर्यादा कोणत्याही परिस्थितीत ओलांडता येणार नाही. ही मर्यादा लक्षात घेऊनच क्रीडा शिक्षक व विशेष शिक्षक असे दोन स्वतंत्र संवर्ग तयार करण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शारीरिक तंदुरुस्ती, खेळांमधील आवड व कौशल्य विकासासाठी नवी दिशा मिळणार असून, ग्रामीण भागातील क्रीडापटूंना पुढे येण्याची संधी निर्माण होणार आहे.






