फोटो सौजन्य - सोशल मी़डिया
West Bengal Schools: पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील सर्व शाळांसाठी ‘वंदे मातरम’ गाणे बंधनकारक केले आहे. नविन निर्देशानुसार शालेय शिक्षण विभागाने या संदर्भात सर्व शिक्षण संस्थांच्या प्रमुखांना नोटिस पाठवली आहे. त्यामध्ये वर्ग सुरू होण्यापूर्वी वंदे मातरम म्हणणे अनिवार्य असल्याचे म्हटले आहे. तसेच या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र या निर्णयामुळे अनेक शाळा प्रमुख संभ्रमात पडले आहेत की, राष्ट्रगीत आणि राज्यगीत य़ांपैकी नेमके काय अनिवार्य आहे.
यापूर्वीच्या सरकारच्या काळात सर्व शाळांना मॉर्निंग असेंब्लीमध्ये ‘बांग्लार माटी, बांग्लार जोल’ हे राज्यगीत गाणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र नव्या सरकारच्या काळात नवीन आदेशानुसार आता ‘वंदे मातरम’ गीत गाणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता शाळेच्या प्रार्थनेत नेमके कोणते गीत गायले जावे, यासंबंधीत संभ्रम निर्माण झाला आहे.
अनेक शाळा प्रमुखांनी असे मत व्यक्त केले आहे की राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रगीत (जन गण मन) अनिवार्य आहे आणि ते वगळणे शक्य नाही अशा परिस्थितीत जर राष्ट्रगीत (वंदे मातरम) आणि (जन गण मन) तसेच राज्यगीत या तिन्हींचा समावेश केला. तर सकाळच्या प्रार्थनेत खूप वेळ जाईल. यामुळे प्रत्यक्ष वर्ग सुरू होण्यास उशीर होऊ शकतो अशी चिंता शाळा व्यवस्थापनाकडून व्यक्त केली जात आहे.
शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नवीन निर्देशात केवळ ‘वंदे मातरम’चा उल्लेख आहे. शाळेच्या प्रार्थनेच्या वेळी वंदे मातरम् गाणे अनिवार्य करण्यात आले असून त्यात राज्यगीताचा कोणताही उल्लेख नाही. सांस्कृतिक आणि राष्ट्रीय गीतांचा सन्मान करणे गरजेचे असले तरी वर्गांना उशीर होणे हे देखील परवडणारे नाही.






