फोटो सौजन्य- सोशल मीडिया
World Youngest Professor Nathan Thomas : नाथन थॉमस यांची कथा अशा तरुणांसाठी एक मोठी प्रेरणा आहे, जे कमी वयात मोठी स्वप्ने पाहतात आणि ती पूर्ण करण्याचे वेड बाळगतात. ज्या वयात बहुतांश विद्यार्थी कॉलेजचे शिक्षण सुरू करतात, त्या वयात नॅथन कॉलेजमध्ये शिकवत होते. अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील राहणाऱ्या नॅथन यांनी १८ वर्षे ३४६ दिवस वयात कॉलेजचे प्राध्यापक बनून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. यासह त्यांनी ३०६ वर्षे जुना विक्रम देखील मोडीत काढला आहे.
नॅथन यांची मियामी डेड कॉलेजमध्ये अभियांत्रिकी इन्स्ट्रक्टर म्हणून नियुक्ती झाली आहे. येथे ते इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना प्रोग्रामिंग आणि तांत्रिक विषय (टेक्निकल सब्जेक्ट्स) शिकवतात. विशेष म्हणजे, त्यांच्या वर्गात शिकणारे अनेक विद्यार्थी वयाने त्यांच्याच वयाचे आहेत. तरीही नॅथन यांचे असे मानणे आहे की, शिकण्याची इच्छा ही वयापेक्षा खूप महत्त्वाची असते. नॅथन यांनी अतिशय लहान वयातच असाधारण प्रतिभा दाखवण्यास सुरुवात केली होती.
वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी त्यांनी शालेय शिक्षणा,सोबतच कॉलेजचे शिक्षणही सुरू केले. यानंतर त्यांनी फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी (ग्रॅज्युएट्स) आणि पोस्ट ग्रॅज्युएशची पदवी सन्मानासह पूर्ण केली. याच वेगवान शैक्षणिक प्रवासाने त्यांना विद्यार्थ्यापासून शिक्षकापर्यंत पोहोचवले.
नॅथन अशा कुटुंबातून येतात जिथे आधीपासूनच इंजिनिअरिंगचे वातावरण होते. बालपणापासूनच त्यांना गणित आणि विज्ञानात रुची होती. ते सांगतात की, त्यांच्या आई गणिताचे अवघड कन्सेप्ट्स सोप्या पद्धतीने समजून सांगत होत्या. याच कारणामुळे त्यांना शिकवण्याची प्रचंड आवड निर्माण झाली. विद्यार्थ्यांना एखादा कठीण विषय समजून घेताना पाहणे हा त्यांच्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण असतो.
इंजिनिअरिंग शिकवण्यासोबतच नॅथन युनिव्हर्सिटी ऑफ मियामी स्कूल ऑफ लॉमधून कायद्याचे शिक्षणही घेत आहेत. भविष्यात त्यांना बौद्धिक संपदा कायदा या क्षेत्रात काम करायचे आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित नवीन शोधांना कायदेशीर संरक्षण मिळवून देण्याच्या क्षेत्रात योगदान देणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे.
नाथन थॉमस यांची ही यशोगाथा हे सिद्ध करते की, वय ही कधीही सर्वात मोठी अट नसते. चिकाटी, जिज्ञासा आणि सातत्याने शिकण्याची इच्छा माणसाला असाधारण उंचीवर नेऊन पोहोचवू शकते. कॉलेजमध्ये एक विद्यार्थी म्हणून प्रवेश करण्यापासून ते जगातील सर्वात तरुण पुरुष प्राध्यापक बनण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास लाखो विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी नक्कीच प्रेरित करतो.






