धक्कादायक ! 14 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; मोबाईल काढून घेतला म्हणून राग आला अन्... (फोटो सौजन्य - X)
मुंबई : आई-वडिलांनी मोबाईलमध्ये गेम खेळण्यास विरोध केल्याने 14 वर्षीय मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गोरेगावमधील आरे कॉलनी परिसरात ही घटना घडली. लक्ष्मी यादव असे या मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी आरे पोलिसांनी नोंद केली आहे.
गोरेगाव (पूर्व) येथील आरे कॉलनी परिसरात वास्तव्यास असलेल्या लक्ष्मी यादवला (वय 14) मोबाईलवर गेम खेळायची खूप आवड होती. तासनतास ती मोबाईलवर गेम खेळत असायची. अभ्यासाकडे दुर्लक्ष करून ती मोबाईलवर खेळत राहायची. त्यामुळे तिचे पालक सतत तिला ओरडत होते. लक्ष्मी सोमवारी दुपारी बराच वेळ मोबाईलवर गेम खेळत होती. त्यामुळे पालकांनी तिचा मोबाईल काढून घेतला. यामुळे लक्ष्मी संतापली. रागाच्या भरात ती दुपारी चारच्या सुमारास आतील खोलीत गेली आणि आतून दरवाजाला लावून घेतला.
हेदेखील वाचा : Vaishnavi Hagavane Case: वैष्णवी मृत्यू प्रकरण; निलेश चव्हाणच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय
दरम्यान, खोलीतील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून तिने आत्महत्या केली. हा प्रकार समजताच पालकांनी तिला खाली काढले. मात्र, तोपर्यंत ती बेशुध्द झाली होती. तिला उपचारासाठी जोगेश्वरीच्या ट्रॉमा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मोबाईल काढून घेतल्याने आत्महत्या
मोबाईल काढून घेतल्याने मुलीने रागाच्या भरात आत्महत्या केल्याचा जबाब तिच्या पालकांनी दिला. त्यावरून आम्ही अपमृत्यूचा गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.