सौजन्य - नवराष्ट्र टीम
शिक्रापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे-नगर महामार्गावरून शिरुर येथील एका हॉस्पिटलमधून रुग्णाला पुणे येथे घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेची दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात रुग्णवाहिकेतील रुग्णासह दोन नातेवाईक आणि अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. यात रुग्णाच्या एक नातेवाईक जागीच ठार झाला आहे. तर एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. घटनेनंतर रुग्ण्वाहिकाचालक फरार झाला आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात सौरभ संतोष महाजन या रुग्णवाहिका चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे- नगर महामार्गावरून एम एच १२ डब्ल्यू जे १७९५ या रुग्णवाहिकेने चालक सौरभ महाजन हा गुरुवारी (दि. १०) रात्री शिरुर येथील रमेश काशिनाथ राठोड या रुग्णाला घेऊन पुण्याच्या दिशेने चालला होता. दरम्यान, सणसवाडी रुग्णवाहिका चालकाचे नियंत्रण सुटून रुग्णवाहिकेची एम एच १२ १४ एम ५२८५ या दुचाकीला जोरात धडक बसून अपघात झाला. यात दुचाकीवरील गोविंद श्रीरंग पोळ व सुरज गणेश जगदाळे दोघांसह रस्त्या जवळील ऋषिकेश गणेश जाधव ((तिघे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) हे गंभीर जखमी झाले. तर रुग्णवाहिकेतील रुग्ण रमेश काशिनाथ राठोड, त्याचे नातेवाईक विकी रमेश राठोड, उषा रमेश राठोड (सर्व रा. रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे) हे गंभीर जखमी झाले. तर रुग्णासोबत आलेला नातेवाईक सुमित बळीराम चव्हाण (वय २८ रा. रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे) हा जागीच ठार झाला.
सर्व जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर शुक्रवारी (दि. ११) दुपारच्या सुमारास जखमी गोविंद श्रीरंग पोळ (रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत जगन्नाथ बबनराव खोपकर (वय ६१ रा. सोलापूर रोड फातिमानगर पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रुग्णवाहिका चालक सौरभ संतोष महाजन (रा. शिरुर ता. शिरुर जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रविकिरण जाधव हे करत आहेत.