पत्नीच्या हत्येसाठी पतीला भोगावा लागला तुरुंगवास (File Photo : Crime)
बीड : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात बीडमधून गुन्हेगारीची सर्वाधिक प्रकरणे समोर येत आहेत. नुकत्याच एका घटनेमुळे बीड पुन्हा हादरले. प्रेम प्रकरणावरून एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. दोन दिवस या युवकाला घराच्या मागे असलेल्या झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.
विकास बनसोडे हा 25 वषीय तरूण जालन्याचा रहिवासी होता. तो आरोपी भाऊसाहेब क्षीरसागर याच्याकडे ड्रायव्हर म्हणून कामाला होता. विकासचे क्षीरसागर याच्या मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले. याची माहिती क्षीरसागरला मिळताच त्याने विकासला घराच्या मागे असलेल्या झाडाला बांधून मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.
हत्येनंतर विकासच्या कुटुंबियांना केला फोन
हत्येनंतर भाऊसाहेब क्षीरसागरने विकासच्या कुटुंबीयांना फोन करून ताबडतोब तुम्ही आमच्या घरी निघून, या असे सांगितले. त्यांच्या संभाषणाचा ऑडिओ क्लीप व्हायरल झाला आहे. यामध्ये क्षीरसागर विकासच्या कुटुंबीयांना सांगतो की, ‘तुम्ही नवरा-बायको लवकरात लवकर या. तुमचे जे कुणी असेल त्याला घेऊन या. इकडे आल्यावर तुम्हाला पराक्रम सांगतो. अर्जंटमध्ये या. जास्त टाईमपास करू नका. तुमचा लेक माझ्याकडे आहे. तुम्ही लवकर आमच्या घरी या’, असे सांगितले होते.
शरीर काळे-निळे पडेपर्यंत मारहाण
पोलिस तपासात एकूण 10 जणांकडून विकासला मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बनसोडेला अमानुष मारहाण झाल्याचे समजताच त्यांनी तपास सुरू केला. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. विकासचे शरीर काळे-निळे पडेपर्यंत मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात 10 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी हानकुडे यांनी दिली आहे.
आरोपींना फाशी द्या, अन्यथा आम्हीच फाशी घेऊ
विकास बनसोडे याचा मारहाणीत मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर त्याचे आई-वडिल व नातेवाईक घुमरी पिंपरी (ता. आष्टी) येथे आले आहेत. कडा येथील आरोग्य केंद्राच्या बाहेर आई-वडील आणि नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. मुलाचा जीव घेणाऱ्या मारेकऱ्याला फाशी द्या, अन्यथा आम्ही दोघे नवरा-बायको इथेच फाशी घेऊ, अशा शब्दात बनसोडे दाम्पत्याने आक्रोश केला.
दहा जणांवर गुन्हा दाखल
भाऊसाहेब भानुदास क्षीरसागर, बाबासाहेब भानुदास क्षीरसागर, स्वाती भाऊसाहेब क्षीरसागर, सुवर्णा बाबासाहेब क्षीरसागर, संकेत भाऊसाहेब क्षीरसागर (सर्व रा. पिंपरी घुमरी ता. आष्टी जि. बीड), संभाजी झांबरे, सचिन भवर, भाऊसाहेब क्षीरसागर, सुशांत शिंदे, बापुराव शिंदे या दहा आरोपींचा या घटनेत सहभाग आहे.