जादा व्याज आमिषाने गडहिंग्लज मध्ये तीन कोटींचा गंडा
गडहिंग्लज : कमी कालावधीत जादा परतावा देण्याच्या आमिषाने दोन कोटी ९५ लाख २५ हजार ४४ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे येथील ‘श्रीमंता बझार’ या कंपनीच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आल्याने गडहिंग्लज उपविभागासह सीमा भागात खळबळ उडाली आहे. फसवणूक झालेले २४ जण गडहिंग्लजसह लगतच्या कर्नाटक सीमाभागातील हुक्केरी तालुक्यातील आहेत.
या प्रकरणी श्रीमंता बझारच्या प्रमुखासह अकरा जणांविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यात रणजित रावण (रा. मुरगूड), अमोल चौगुले (रा. मुरगूड चिमगाव, दोन्ही ता. कागल), वैशाली गुरव (रा. हलकर्णी, ता. गडहिंग्लज), श्रीकांत आचार्य (श्रीमंता बझारचा सर्वेसर्वा, रा. पुणे), सदाशिव चव्हाण रा पिंपळगाव ता भुदरगड, तुषार चोथे गडहिंग्लज, दिनेश भटनागर (पुणे), धर्मेंद्र सिंगर (बुधणी, मध्यप्रदेश) विठ्ठल जाधव (गडहिंग्लज) रमेश शिरगांवे (हेब्बाळ, गडहिंग्लज) आदींचा समावेश आहे.
हेदेखील वाचा : गुंतवणुकीतून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला गंडा; तब्बल 6 कोटींची फसवणूक
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, श्रीमंता बझार पुणेकडून गुंतवणुकदार गोळा करून जादा व्याज देण्याचा बहाणा केला जात होता. मदनकुमार बाळासाहेब शिंदे (कौलगे, गडहिंग्लज) यांनी फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल केली आहे. २०२१ पासून कंपनीने आपल्यासह २३ जणांचा विश्वास संपादन करून फसवणूक केल्याचे म्हटले आहे. या संशयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विजय घाटगे करीत आहेत.
जावई-सासऱ्याच्या जोडीने एकाला घातला गंडा
दुसऱ्या एका घटनेत, इलेक्ट्रॉनिक्स बाजारात पैसे गुंतवणुकीवर नऊ ते बारा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाला जावई व सासऱ्याच्या जोडीने तब्बल सहा कोटी नऊ लाख ५७ हजार १०३ रूपयांचा गंडा घातला. गंडा घालणाऱ्या जावयाचे नाव शेख रियाज व त्याचे सासरे सय्यद अनिस रझवी (रा. बड़े नवाब बाडा, चेलूपर, ह.मु. युनाईटेट अरब इमिरेटस, दुबई) असे आहे.