संग्रहित फोटो
पुणे/ अक्षय फाटक : वेगाने वाढणाऱ्या शहराच्या सुरक्षिततेसाठी तसेच पुणेकरांच्या अडचणींना तत्काळ मदत मिळण्यासाठी पुण्यात आणखी नवीन ५ पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. नव्या पाच पोलिस ठाण्यांची रूपरेषा निश्चित झाली असून, त्यासंदंर्भानुसार प्रशासनाला प्रस्ताव येत्या आठवड्यात सादर करण्यात येणार आहे. शहराची गरज ओळखून पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे पोलिस दल सक्षम करण्यासाठी पावले उचलली आहेत. नुकतीच ७ पोलिस ठाणी कार्यान्वित झाल्यानंतर आणखी ५ पोलिस ठाणी सुरू करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
पुण्याचा विस्तार झपाट्याने होत आहे. नागरीकरण देखील वर्षागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सोबत गुन्हेगारीचे बदलते स्वरूप आणि वाढलेली गुन्हेगारी यामुळे पोलिस यंत्रणेवर त्याचा प्रचंड ताण पडत आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तालय वेगळे झाल्यानंतर पुण्याच्या पोलिस दलात मोठा बदल झाला. पाच परिमंडळ झाले तरी पुणे ग्रामीणचे दोन पोलिस ठाणे शहरात (लोणीकंद व लोणी काळभोर) आले. त्याचे क्षेत्रफळ तुलनेने शहरातील इतर सर्व पोलिस ठाण्यांचे मिळून अर्धे होते. त्यामुळे भौगिलीक दृष्ट्या पुणे पोलिस आयुक्तालयाची हद्द मोठ्या प्रमाणात विस्तारली गेली. त्यामुळे यंत्रणेची दमछाक देखील होत असल्याचे वास्तव आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्विकारल्यानंतर शहराच्या तुलनेने पुणे पोलिसांची गरजा आणि अडचणी पाहून शासनाकडे पाठपुरावा करून पुण्याला आवश्यक मनुष्यबळ व पोलिस ठाण्यांच्या गरजा, याचे महत्व आधोरेखीत केले. परिणामी ७ पोलिस ठाण्यांची सुरूवात देखील तत्काळ झाली. परंतु, पुढील काही वर्षांची गरज ओळखून आणखी पाच पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्याच्या दृष्टीने काम सुरू केले आहे. त्यानूसार, नव्या पाच पोलिस ठाण्यांची रूपरेषा तयार करण्यात आली आहे. त्याचा प्रस्ताव प्रस्ताव येत्या आठवड्यात शासनाला सादर केला जाणार आहे.
‘ही’ असणार नवीन ५ पोलिस ठाणे
नवीन ३० चौक्यांही प्रस्तावित!
नवीन पाच पोलिस ठाण्यांसोबतच नागरिकांच्या दृष्टीने तसेच कामकाजासाठी सूसित्रकरणासाठी महत्वाच्या असणाऱ्या ३० पोलिस चौक्यांही प्रस्तावित आहेत. त्यासंदंर्भाने देखील हालचाली सुरू असून, त्याचीही रूपरेषा ठरविण्यात आली आहे. नवीन पोलिस ठाण्यांसोबतच या चौक्यांही कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे मदत ही वेळेत पोहचणार आहे.
पोलिस ठाण्यांचे महत्व का?
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच प्रचंड लोकसंख्येच्या तुलनेत पोलिस दलातील मनुष्यबळ, तांत्रिक साधने आणि गरज ओळखून नुकतीच कार्यान्वित केलेली ७ नवी पोलिस ठाणी तसेच पुढील काही वर्षांचे नियोजित लोकसंख्या वाढ लक्षात घेता आणखी ५ ठाणी व ३० चौक्यांची आवश्यकता असल्याने हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.