नसरापूर, पर्वतीनंतर आता अकोल्यातील अत्याचार प्रकरण समोर; 60 वर्षीय नराधमाचा बालिकेवर अत्याचार(फोटो सौजन्य : iStock)
अकोला : नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. असे असताना अकोल्याच्या पातूर तालुक्यातील एका गावात असाच धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. वृद्धाने शेजारी राहणाऱ्या एका 10 वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना घडली. यामुळे भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले.
जगराम गोविंद आडे (वय ६०) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध चान्नी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित बालिकेचे आई-वडील हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आई-वडील कामावर गेल्यानंतर शाळेला सुटी असल्याने ती घरी एकटीच राहत होती. संधी साधून शेजारी राहणाऱ्या वृद्धाने अत्याचार केला. आरोपी बालिकेला धमकावत असल्याने ती भयभीत झाली. त्यामुळे हा प्रकार सुरुवातीलाच कुणालाच सांगितला नव्हता. मात्र, सातत्याने होणारा अत्याचार तिला असह्य झाला. मंगळवारी तिने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यांनी तातडीने चान्नी पोलिस ठाण्यात धाव घेतली. यानंतर नराधम वृद्ध गावातून पसार झाला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.
पीडितेची प्रकृती गंभीर
पीडित मुलीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत असून तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आला आहे. या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नराधमावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
पुण्यात नातीवरच बलात्काराचा प्रयत्न
पुण्यातील पर्वती येथील ७० वर्षांच्या वृद्धाने आपल्या स्वतःच्या नातीवरच अत्याचाराचा प्रयत्न केला. या मुलीचे आई-वडील हे कामाला जातात. ते घरी नसताना या वृद्धाने घरातच नातीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याविषयी बोलताना मुलीच्या पालकांनी संताप झाला पाहिजे. माझ्या मुलीच्या अंगावर हात टाकणाऱ्या माझ्या बापाला फाशी द्या, अशी संतप्त मागणी मुलीच्या आईने केली. मुलीच्या आईने सांगितले की, मी कपड्याच्या दुकानात कामाला जाते. माझे पती रिक्षा चालवतात. मी रात्री घरी आले तेव्हा मुलीने मला हा सगळा प्रकार सांगितला. तिच्या अंगावर कपडे नव्हते. तसेच अंगावर नखांचे ओरखडे होते.
नसरापूर अत्याचार प्रकरणानंतर महापौर अॅक्शन मोडवर; महापालिका आयुक्तांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश






