बुलडाण्यात सात वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नराधमाने बालिकेला घरात बोलावले अन् नंतर...
जळगाव जामोद : माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना जळगाव जामोद तालुक्यातील एका गावात शनिवारी उघडकीस आली. एका सात वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नराधम दुकानदाराला पोलिसांनी अटक केली. प्रफुल्ल अनिल सपकाळ असे आरोपीचे नाव असून, त्याच्या या कृत्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पीडित बालिका घराशेजारीच असलेल्या आरोपीच्या दुकानात खायची वस्तू घेण्यासाठी गेली होती. यावेळी घरात कोणीही नसल्याची संधी साधून, आरोपीने अतिशय चलाखीने ‘माझ्या हाताला लागले आहे, तू स्वतः फ्रिजमधून पेप्सी घे’ असे सांगून तिला घराच्या आत बोलावले. मुलगी घरात शिरताच आरोपीने तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या भयानक प्रसंगातून स्वतःची सुटका करून घेत पीडित मुलगी रडत घरी पोहोचली आणि तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. संतापलेल्या वडिलांनी तत्काळ आरोपीचे दुकान गाठून त्याला जाब विचारला असता, त्याने ‘मी काहीच केले नाही, तुला काय करायचे ते कर’ अशी उलट धमकी दिली.
महिला पोलिस उपनिरीक्षकांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
घटनेचे गांभीर्य ओळखून पीडितेच्या वडिलांनी जळगाव जामोद ठाणे गाठून तक्रार नोंदवली. महिला पोलिस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे यांनी तत्परतेने या प्रकरणाची दखल घेत नराधम सपकाळ याच्या मुसक्या आवळल्या आहेत. समाजातील अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तींमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. पोलिसांनी या नराधमाविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. मात्र, आरोपीला केवळ कायद्याचा धाक न दाखवता, कठोर शिक्षा करण्याची मागणी आता जनसामान्यांतून होत आहे.






