संग्रहित फोटो
पुणे : कल्याणीनगर परिसरात निवासी भागातील लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायप्रकरणी लॉजचालक महिलेवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठांनी लक्ष घातल्यानंतर स्थानिक पोलिसांनी या गुन्ह्यात महिलेचा समावेश केला आहे. दरम्यान, आता याप्रकरणांसह यापुर्वीच्या गुन्ह्यांबाबत देखील वरिष्ठांकडून नजर ठेवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे त्या महिलेला त्याचदिवशी का ? गुन्ह्यात सहभागी केले नाही, याचीही चौकशी वरिष्ठांकडून होण्याची शक्यता आहे.
सोनिया गिडवाणी असे त्या महिलेचे नाव आहे. पोलीस तक्रारीत नाव नमूद असूनही सुरुवातीला महिलेचे नाव या गुन्ह्यात घेतले नाही. त्यामुळे पोलीस दलात उलट-सुलट चर्चा सुरू होती. महिलेचे नाव न घेण्यामागे तसेच तिला मोकळीक देऊन नेमके कोणाचे ‘भले’ होणार होते, याबाबत पोलीस दलात कुजबूज सुरू होती. आता या महिलेसह अन्य दोघांना याप्रकरणी नव्याने आरोपी करण्यात आले आहे.
वेश्या व्यवसायावर छापा कारवाईनंतर याप्रकरणी लॉज व्यवस्थापक अमोल तांबडे (वय २८, रा. श्रीरामपूर, अहिल्यानगर) आणि एजंट बंटी या दोघांना अटक केली. याप्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ सह, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. मात्र, पोलीस अंमलदाराने दिलेल्या तक्रारीनुसार लॉजचालक महिलेच्या नावाचा उल्लेख असतानाही तिच्यावर गुन्हा दाखल केला नव्हता. त्यावर महिलेच्या गुन्ह्यातील सहभागाची पडताळणी करून महिलेला आरोपी केले जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले होते.
दरम्यान, अटक आरोपी अमोल तांबडे याच्याकडे तपास केला असता, स्प्रिंग ब्रुक लॉजमध्ये येणाऱ्या ग्राहकांना सोनिया गिडवाणी यांच्या सांगण्यावरून मुलींचे फोटो आणि मोबाइल क्रमांक देत होतो. गिडवानी आणि अन्य दोघांच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना लॉजमध्ये महिला पुरवून वेश्याव्यवसाय केला जात होता, असे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे या गुन्ह्यात गिडवाणीसह अन्य दोघांना आरोपी करण्यात आले असून, त्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. तसेच, या गुन्ह्यात एकापेक्षा अधिक व्यक्ती गुंतलेल्या असल्यामुळे भारतीय न्याय संहितेचे कलम १४३ (३) प्रमाणे गुन्ह्यात कलम वाढ करण्यात आली आहे.
मूळ मालकाला न्याय मिळणार?
सोनिया गिडवाणी आणि अन्य एका व्यक्तीवर स्प्रिंग ब्रुक लॉजवर ताबा मारल्याप्रकरणी जून २०२३ मध्ये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात येरवडा पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलेले आहे. लॉजच्या मूळ मालकाने गिडवाणी आणि अन्य एका व्यक्तीला स्प्रिंग ब्रुक लॉज भाडे तत्त्वावर चालविण्यास दिला होता. त्याचा कायदेशीर करारही करण्यात आला होता. कराराची मुदत संपल्यावर दोघांनी लॉजचा ताबा मूळ मालकाला दिला नव्हता. तसेच, भाडे देणेही बंद केले होते. असे दाखल गुन्ह्यात नमूद आहे. या लॉजच्या मूळ मालकाला आता तरी न्याय मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.