सौजन्य - सोशल मिडीया
पाटण : पाटण तालुक्यातील मरळी (दौलतनगर) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास शनिवारी (दि. २२) रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कारखान्याची रेकॉर्ड रूम आणि शेती ऑफिस पूर्णपणे जळून खाक झाले. या आगीत ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही.
मल्हारपेठचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले आणि महिला पोलीस उपनिरीक्षक एस. बी. शेळके पोलीस फौजफाट्यासह रविवारी दिवसभर आगीच्या कारणाचा शोध घेत होते. याबाबत मल्हारपेठचे ठाणे अंमलदार माने यांनी माहिती दिली. देसाई साखर कारखान्याच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. कारखान्याच्या गव्हाणवाडी बाजूकडून शनिवारी (दि. २२) रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत जीवितहानी झाली नसली, तरी कारखान्याची महत्त्वाची कागदपत्रे असलेली रेकॉर्ड रूम आणि शेती ऑफिस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. कारखान्याचा गळीत हंगाम नुकताच संपला आहे.
अग्निशमन दलास केले पाचारण
आग लागल्याचे रात्री कामावर असलेल्या सुरक्षारक्षकांना समजताच, त्यांनी तिकडे धाव घेतली. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यांनी तातडीने हालचाल करून, कराड नगरपरिषद, सह्याद्री कारखाना, जयवंत शुगर आणि सातारा येथील अजिंक्यतारा कारखान्याच्या अग्निशमन दलास पाचारण केले. देसाई कारखान्याच्या अग्निशामक बंबासह ४ ते ५ अग्निशामक बंबांच्या साह्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली. कराड व सातारा येथील अग्निशामक बंब यायला वेळ लागल्याने आग तत्परतेने शमवण्यात यश आले नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस तपासात काही संशयास्पद आढळल्यास गुन्हा नोंदवण्यात येईल, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
अद्याप काहीही संशयास्पद आढळलेले नाही. कारखान्याच्या आजूबाजूला शेती आहे. त्यातील गवताला आग लागली होती. ही आग पसरून, कारखान्याच्या आतील बाजूस लागली असावी. आमचा तपास अजून सुरू आहे. कोणी हेतुपुरस्सर हे कृत्य केले आहे का, याचा तपास करण्यात येत आहे.
– चेतन मछले, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मल्हारपेठ.