संग्रहित फोटो
पुणे : फुरसुंगी भागातील एका व्यक्तीला तब्बल १० कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून ३५ लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उल्हास रामचंद्र शेवाळे (वय ४९, रा. शेवाळवाडी, उरुळी देवाची) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, माधुरी हेमंत शिरोडकर (वय ५१, रा. आर-२५, चैतन्यनगरी, वारजे जकात नाका, पुणे) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
ही फसवणूक ११ डिसेंबर २०२० रोजी दुपारी १.३० वाजल्यापासून ते १७ मे २०२४ रोजी २.३० वाजेपर्यंत कालावधीत झाली आहे. संबंधित प्रकरण फुरसुंगी पोलीस ठाण्यात २३ मे २०२५ रोजी रात्री १०. ४२ वाजता नोंदवण्यात आले असून, गुन्हा भारतीय दंड विधान कलम ४०६ (विश्वासघातकी गैरवर्तणूक) आणि ४२० (फसवणूक) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, माधुरी शिरोडकर यांनी उल्हास शेवाळे यांना १० कोटी रुपये कर्ज मिळवून देतो असे सांगून एका बँक अधिकाऱ्याचे नाव सांगितले. कर्जासाठी लागणारी प्रोसेसिंग फी, खर्च आदी कारणे सांगून वेळोवेळी रोख स्वरूपात, धनादेशाद्वारे तसेच बँक खात्यातून एकूण ३५ लाख रुपये घेतले. मात्र, प्रत्यक्षात कर्ज मंजूर झाले नाही आणि घेतलेली रक्कमही परत करण्यात आली नाही. त्यामुळे शेवाळे यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देशमुख करत आहेत.
शेअर बाजारात गुंतवणूकीच्या आमिषाने फसवणूक
‘शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास ३० ते ३५ टक्के परतावा मिळेल,’ असे आमिष दाखवून अनेकांची १ कोटी २१ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी धायरीतील ३४ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. त्यावरून नांदेडसिटी पोलिसांत गुजरातमधील प्रियांक दवे, अभयकुमार दवे, मित दवे, सुमित बोराणा, झील जैन, अयुष सेवक, जय पटेल, पंकज जैन, पिंटू जानी आणि निकुंज जानी (रा. लुणावडा व गोध्रा, गुजरात) अशा नावाच्या व्यक्तींवर गुन्हा नोदंवला आहे.