संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून खून, मारामारी, दरोडे यासारखे गुन्हे उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कात्रज भागातील गुजरवाडी परिसरात अनैतिक संबंधांना विरोध केल्याने जमीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पसार झालेल्या दोघांना अटक केली आहे. मनोहर दिनकर शिंदे (वय ४६, रा. पवारनगर, गुजरवाडी रस्ता, मांगडेवाडी, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रोहित उर्फ बुधाजी मारुती असोरे (वय ३२), केशव मोतीराम असोरे (वय २६, दोघे रा. खोपडेनगर, गुजरवाडी, कात्रज) यांना अटक करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, मनोहर शिंदे यांच्या नात्यातील एका महिलेचे आरोपी रोहित याच्याशी अनैतिक संबंध होते. रोहित रिक्षा चालवायचा. नंतर त्याने प्रवासी वाहने भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय सुरू केला. मनोहर यांनी अनैतिक संबंधांना विरोध केला होता. यावरुन त्यांच्यात यापूर्वी वाद झाला होता. शुक्रवारी रात्री रोहित व त्याच्याबरोबर असलेले दोन ते तीन साथीदार कात्रज भागातील पवारनगर भागात आले. रोहित, केशव आणि साथीदारांनी शिंदे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यांच्या डोक्यात बांबू घातला.
डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने शिंदे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेला आरोपी रोहितला ताब्यात घेतले. त्याचा साथीदार केशव याला बीडमधील गेवराई परिसरातून ताब्यात घेण्यात आले. वरिष्ठ निरीक्षक सावळाराम साळगावकर तपास करत आहेत.