संग्रहित फोटो
पुणे : अल्पवयीन मुलांकडून गंभीर गुन्हे घडत असतानाच एका पंधरा वर्षाच्या मुलाने तेरा वर्षाच्या मुलीला ‘प्रपोज’ केले. पण, तिने नकार दिल्यानंतर त्या मुलाने थेट खुनाची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच, त्याने तिच्यासोबत गैरवर्तनही केले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने मुंढवा पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मे २०२५ पासून घडत असून, १३ वर्षीय मुलीचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी मुलगा हा पीडितेच्या ओळखीचा आहे. त्याने तिला जवळ बोलावून ‘तू माझी गर्लफ्रेंड हो, नाहीतर मी कोणाचा तरी खून करून तुझे नाव घेईन,’ अशी धमकी दिली. नंतर त्याने तिला घराच्या मागे बोलावून तिच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे मुलगी आणि तिच्या कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पीडितेच्या आईने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पुढील तपास मुंढवा पोलिसांकडून करण्यात येत आहे.
तरुणीला जबरदस्ती वेश्या व्यवसायात ढकलले
बांगलादेशमधून कामाच्या निमित्ताने भारतात आणलेल्या एका अल्पवयीन मुलीला पुण्यातील बुधावर पेठेत जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिला ब्युटी पार्लरमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. मात्र, नंतर दलाल व्यक्तींनी तिला बुधवार पेठेतील कुंटणखान्यात ठेवले. तसेच, वेश्याव्यवसायासाठी जबरदस्तीही केली. नकार दिल्यानंतर या तरुणीला पट्ट्याने मारहाण करण्यात आली. एका सामाजिक संस्थेने हा प्रकार समोर आणत पोलिसांच्या मदतीने तरुणीची सुटका केली आहे. याप्रकरणी अभिषेक प्रकाश संथेबेन्नूर (वय २२, कर्नाटक) व तमन्ना मुख्तार शेख (रा. बांगलादेश) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर रकीब खान फरार असून, याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (पीटा), बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण प्रतिबंध कायदा (पोक्सो), पारपत्र अधिनियमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आळंदीत वारकरी संस्थेत तरुणीवर लैंगिक अत्याचार
आळंदी येथील केळगाव रस्त्यावर असलेल्या मुलींच्या एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत युवतीला जबरदस्तीने डांबून ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार करत लग्नासाठी बळजबरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबत संबंधित तरुणीने पाच जणांविरुद्ध जबरदस्तीने अपहरण करून अत्याचार केल्याची गंभीर तक्रार अहिल्यानगर शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.