इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे मैत्रीत रूपांतर (फोटो सौजन्य: Freepik)
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय वाढताना दिसत आहे. त्यातच आता आत्महत्येची धमकी देत एकाने शाळकरी मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे येथे शिक्षण घेणाऱ्या पीडित मुलीने पुण्यातील भूमाता फाऊंडेशनचे कार्यालय गाठल्याने हा प्रकार पोलिसात पोहोचला असून, नऱ्हे पोलिसांनी तपासासाठी हा गुन्हा अंबड पोलिसांकडे वर्ग केला आहे.
हर्षल मधुकर माळी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडित मुलगी आणि संशयित परिचयाचे असून, त्याने तू माझे ऐकले नाही तर मी आत्महत्या करण्याची धमकी दिली. शहरातील सातपूर अंबड लिकरोडवरील एका संकुलात हा प्रकार घडला. अल्पवयीन मुलगी शाळेत असताना तिची संशयिताशी मैत्री झाली होती. २०२४ मध्ये संशयिताने १६ वर्षीय मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून तिला आत्महत्येची धमकी देत बळजबरीने अत्याचार केला. यावेळी त्याने मुलीचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढला.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! डॉक्टर महिलेवर सातत्याने अत्याचार; व्हिडिओ, फोटोही काढले, विविध हॉटेलमध्ये बोलवायचा अन्…
यानंतर त्याने अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केला. या जाचास कंटाळून गेल्या वर्षी मुलीने त्याच्याशी बोलणे बंद केले असता त्याने शिवीगाळ व मारहाण केली. मुलगी सध्या पुण्यात शिक्षण घेत असून, तिच्या विरहात त्याने मुलीच्या आई-वडिलांशी संपर्क साधत आत्महत्येची आणि अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलीने भूमाता फाऊंडेशनची मदत घेत नऱ्हे पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर घडला प्रकार समोर आला.
इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे मैत्रीत रूपांतर
दुसऱ्या एका घटनेत, इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले, पण त्यानंतरच तीच ओळख एका महिला डॉक्टरसाठी महागात पडल्याचे समोर आले. अमरनाथविरोधात वेदांत नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तक्रारीनुसार, महिला डॉक्टरची आरोपी अमरनाथसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. काही दिवसांतच दोघांमध्ये संपर्क वाढला. त्यातून मैत्रीचे नाते घट्ट होत असताना आरोपीने तिचा गैरफायदा घेतला. शहरातील रेल्वेस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलावून त्याने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले आणि त्याचे फोटो-व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले.






