संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मंचरमधील डॉक्टरचे अपहरण करून खंडणी उकळणाऱ्या सराइताला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
प्रवीण उर्फ डॉलर सीताराम ओव्हाळ (वय ३२, रा. वाळद, ता. खेड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका डॉक्टरने मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारदार डॉक्टर असून, ते ४ जानेवारी रोजी पेठ ते मंचर या मार्गाने दुचाकीने निघाले होते. तेव्हा कारने आलेले आरोपी पवन सुधीर थोरात (रा. मंचर, जि. पुणे) आणि ओव्हाळ त्यांच्या मागावर होते. दुचाकीस्वार डॉक्टरला कारने धडक दिल्याने ते रस्त्यात पडले. नंतर त्यांचे अपहरण करुन निघोटवाडी परिसरात नेले. तेथे त्यांना बेदम मारहाण करुन २० लाख रुपयांची खंडणी मागितली. डॉक्टरांना धमकावून त्यांनी पिस्तुलातून एक गोळी झाडली, तसेच त्यांच्याकडून एक लाख रुपयांची खंडणी उकळली. त्यानंतर पेठ घाटात डॉक्टरला सोडून आरोपी थोरात आणि ओव्हाळ मोटारीतून पसार झाले.
याप्रकरणी मंचर पोलिसांत गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींना पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, आरोपी ओव्हाळ व थोरात सराइत असून, त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. पसार झालेला आरोपी थोरात याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याबरोबर असलेला ओव्हाळ पसार झाला होता. गेले दोन महिने पोलीस ओव्हाळच्या मागावर होते. पसार झालेला ओव्हाळ आळेफाटा एसटी स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अक्षय नवले यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून ओव्हाळला पकडले.
दरम्यान त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणाचा पुढील तपास आळेफाटा पोलिसांकडून करण्यात येत आहे. आरोपी ओव्हाळ याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.