संग्रहित फोटो
पुणे : पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात एका विवाहितेने आपल्या सहा वर्षाच्या चिमुकल्यासोबत इमारतीवरून उडी मारून जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला आहे. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मयुरी शशिकांत देशमुख (वय ३१) तसेच विष्णु देशमुख (वय ६) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या आई व मुलाचे नाव आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मयुरी एका खासगी शाळेत नर्सरीच्या वर्गाला शिकवत होती. तर पती शशिकांत हा एका बँकेत नोकरी करत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आंबेगाव बुद्रुकमधील देशमुख कुटूंब कल्पक सृष्टी सोसायटी येथे राहण्यास होते. त्यांना विष्णु हा एक मुलगा होता. देशमुख कुटूंब मुळचे बुलढाणा जिल्ह्यातील आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पुण्यात राहण्यास आहे.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास मयुरी हिने आपल्या ६ वर्षांच्या विष्णु या मुलासह पाचव्या मजल्यावर जाऊन टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. मोठा आवाज झाल्याने सोसायटीतील नागरिक बाहेर आले. तेव्हा हा प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी येथे धाव घेतली. अधिक तपास सुरू आहे.
हे सुद्धा वाचा : उधारीवर दारू न दिल्याने वाईन शॉपीची तोडफोड; कामगारावरही केले वार
मयुरीजवळ आढळली सुसाईड नोट
मयुरी हिने आत्महत्या करण्यापुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. तिने एका पानावर नंदेबाबत मजकूर लिहीला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे नंदेच्या त्रासामुळे मी हा निर्णय घेत असल्याचे म्हंटले आहे. त्यानंतर तिने हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, घरी कोणी नसताना हा प्रकार घडल्याचे समजते.