संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. कोंढवा भागात दारू पिताना झालेल्या वादातून एकाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मनीषकुमार महादेव पासवान (वय २२, रा. पंचशीलनगर, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी महादेव अर्जुन कांबळे (वय ३५, रा. श्री स्वामी समर्थनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) याला अटक केली आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक शिवराज खराडे यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी कांबळे हा केटरींग व्यवसायिकाकडे काम करतो तर पासवान हा मजुरीचे काम करतो. दोघांना दारु पिण्याचे व्यसन आहे. गुरुवारी (३० एप्रिल) सायंकाळी सातच्या सुमारास कांबळे आणि पासवान हे कोंढव्यातील आर. के. कॉलनी भागातील टेकडीजवळ असलेल्या झाडाखाली दारू पित बसले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. यावरून कांबळेने पासवानच्या डोक्यात दगड घातला. पासवान गंभीर जखमी झाला. कांबळे तेथून पसार झाला. दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पासवान याला रुग्णालयात दाखल केले असता, त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक आयुक्त नम्रता देसाई, पोलिस निरीक्षक दीपक कारंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पसार झालेल्या कांबळेला पकडले. पोलीस निरीक्षक कारंडे तपास करत आहेत.
3 वर्षांच्या मुलावर अत्याचार करून निर्घृण खून
पुणे जिल्ह्यातील औद्योगिक पट्टा असलेल्या चाकणमधील दक्षिण महाळुंगे परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. अवघ्या तीन वर्षांच्या निष्पाप बालकावर अज्ञात नराधमाने अनैसर्गिक अत्याचार करून त्याची गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह सुटकेसमध्ये ठेवून लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित बालक घरातून बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. दरम्यान, दक्षिण महाळुंगे येथील एका निर्जन ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बालकाचा मृतदेह आढळून आला. शरीरावरील जखमा आणि गळा चिरलेला असल्यामुळे ही हत्या अत्यंत क्रूरपणे केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच महाळुंगे व चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.






