संग्रहित फोटो
सावंतवाडी : आंबोली घाटात रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली आहे. या अपघातात चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे. निकिता प्रसाद राऊत (वय १०) असे या चिमुकलीचे नाव आहे. तर चिमुकलीची आई चैताली राऊत या गंभीर जखमी झाल्या आहेत. घाटातील ‘यू’ आकाराच्या वळणावर हा थरार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राऊत कुटुंबीय आपल्या दुचाकीवरून आंबोलीहून सावंतवाडीच्या दिशेने जात होते. याच वेळी फरशा वाहून नेणाऱ्या एका ट्रकने (जो चालक नशेच्या अवस्थेत असल्याचे बोलले जात आहे) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, निकिता दुचाकीवरून खाली फेकली गेली आणि तिचा जागीच अंत झाला. अपघात घडल्यानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही किलोमीटर अंतरावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या मधोमध पलटी झाला. ट्रकमधील फरशा रस्त्यावर विखुरल्या गेल्यामुळे घाटातील दोन्ही बाजूची वाहतूक तब्बल अडीच तास ठप्प झाली होती.
ग्रामस्थांचा संताप आणि पोलिसांची कारवाई
या घटनेची माहिती मिळताच आंबोलीतील ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठी गर्दी केली. चिमुकलीच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत, ‘संबंधित चालक आणि क्लीनरला आमच्या ताब्यात द्या’ अशी मागणी केली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीस हवालदार रामदास जाधव, संतोष गलोले आणि पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांनाही ताब्यात घेतले आहे.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न
रस्त्यावर पलटी झालेला ट्रक आणि विखुरलेल्या फरशांमुळे लागलेली वाहनांची रांग जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा आणि नगरसेवक देवा टेमकर यांच्या सहकार्याने पोलिसांनी बाजूला केली आणि वाहतूक पूर्ववत केली. या दुःखद घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.






