राहत्या घराला अचानक भीषण आग; एकाचा मृत्यू, अनेक साहित्य आगीत जळून खाक (संग्रहित फोटो)
नागपूर : शहराच्या प्रेमनगर परिसरातील एका घराला भीषण आग लागली. या आगीत गंभीररित्या होरपळून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर घरातील सर्व साहित्य आगीत जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. जवळपास 2 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात रवाना केला.
उमेश नारायण पालिवाल (वय ५०, रा. झेंडा चौक, प्रेमनगर) असे मृताचे नाव आहे. उमेशच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमनगर गल्ली क्र. ७ च्या झेंडा चौकात पालिवाल कुटुंबाची जुनी दुमजली इमारत आहे. उमेश आणि त्यांचे कुटुंब हे वरच्या माळ्यावर राहतात, तर तळमाळ्यावर त्यांचे मोठे भाऊ जगदीश पालिवाल राहतात. उमेश हे हातमजुरी करत होते. मात्र, गेल्या काही काळापासून अर्धांगवायूमुळे हालचाल करू शकत नसल्याने घरीच राहात होते. त्यांची पत्नी परिसरातील घरांमध्ये धुणी-भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगीही आहे. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास उमेश पालिवाल यांची पत्नी आणि मुले, तसेच खाली राहणारे त्यांचे मोठे भाऊ घरी नव्हते. यातच घरात अचानक आग लागली.
दरम्यान, घरी कुणीच नसल्याने ही बाब लक्षात आली नाही आणि आग संपूर्ण घरात पसरली. परिसरात धूर पसरल्याने स्थानिक नागरिकांचे याकडे लक्ष गेले. तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. लकडगंज आणि वाठोडा अग्निशमन केंद्रातून २ बंब घटनास्थळी पोहोचले.
पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण
तत्काळ पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न सुरू केले. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझविण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत घराबाहेर पडणे शक्य झाले नसल्याने उमेश यांचा होरपळून मृत्यू झाला होता.
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता
घरातील एखाद्या विजेच्या उपकरणामध्ये शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली असावी आणि अर्धांगवायूने ग्रस्त असल्यामुळे उमेश पालिवाल स्वतःला वाचवू शकले नाही, असा प्राथमिक अंदाज अग्निशमन विभाग आणि पोलिसांनी व्यक्त केला.
आत्महत्येचीही मोठी चर्चा
शांतीनगर पोलिसांनी सांगितले की, सध्या तरी ही घटना अपघात असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, पोलिस सर्व बाजूने तपास करत आहेत. स्थानिक नागरिकांनुसार, उमेश अनेक दिवसांपासून आजारी असल्याने सतत तणावात राहत होते. त्यामुळे पोलिस या घटनेचा तपास आत्महत्येच्या दृष्टीनेही करत आहेत. सध्या पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली.
हेदेखील वाचा : वेड्यांचा बाजार! पायाला आग लावून दाखवत मारत होता हुशारी, तितक्यातच हवेची झुळूक आली अन् संपूर्ण शरीर जळू लागलं; Video Viral






