पत्नीच्या हत्येसाठी पतीला भोगावा लागला तुरुंगवास (File Photo : Crime)
छत्रपती संभाजीनगर : मूलबाळ होत नसल्याने पत्नीनेच सेवानिवृत्त शिक्षक असलेल्या पतीचा डोक्यात दगड टाकून खून केल्याचे पोलिसांच्या तपासात बुधवारी समोर आले. यासंदर्भातील माहिती शिल्लेगाव पोलिसांनी दिली. याप्रकरणी शिल्लेगाव पोलिसांनी आरोपी भारती पमुसिंग पपैया (वय 51) हिला अटक केली आहे.
लासूर स्टेशन येथील डोणगाव रोडवरील हनुमान मंदिर परिसरातील रहिवासी, सेवानिवृत्त शिक्षक पमुसिंग छगनसिंगग पपैया (वय 64) हे 13 मार्चला राहत्या घरी पाण्याच्या हौदात पडले व त्यात त्यांचा करुण अंत झाल्याची माहिती दिली जात होती. दरम्यान, त्या शिक्षकाचा अपघाती मृत्यू हौदात पडून झाला की खून झाला याबाबत गावकऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. मात्र, शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश खटाणे आणि पथकाने पमुसिंग यांच्या मृत्यूचा तपास करून तो खून असल्याचे समोर आणले. भौतिक पुराव्यावरून तपास केल्याचे पोलिसांनी सांगितले.
खुनाची दिली कबुली
निवृत्त शिक्षकाच्या खुनाच्या संशयाची सुई मनोरुग्ण असलेल्या त्याच्या पत्नीभोवती फिरत होती. अखेर मनोरुग्ण पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता भारती पमुसिंग पपैया हिने नवऱ्याच्या खुनाची कबुली दिली. मृताचा पुतण्या नीलेश गोपालसिंग पपैया (वय ४०, आसेगाव ता. गंगापूर) यांच्या फिर्यादीवरून भारती पपैया हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भारती पपैया हिला अटक केली असून, न्यायालयाने तिची रवानगी हर्सल कारागृहात केल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ
राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता मूलबाळ होत नसल्याने 51 वर्षीय पत्नीकडूनच पतीची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.