संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरातील गुन्हेगारी थांबताना दिसत नाही. दररोज खून, हाणामाऱ्या, लुटमार, धमकावणे अशा घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता पुण्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. धानोरीत महिलेचा खून करुन पसार झालेल्या बांधकाम मजुराला पोलिसांनी अटक केली आहे. एका गृहप्रकल्पाजवळ महिलेचा मृतदेह सापडला होता. विश्रांतवाडी पोलिसांच्या पथकाने २४ तासात खून प्रकरणाचा छडा लावला.
गीता विक्रम रेड्डी (वय ४५, रा. टिंगरे चाळ, धानोरी गावठाण ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी रामध्यान महाबल चौहान (वय ३१, सध्या रा. पत्र्याची खोली, पाण्याच्या टाकीजवळ, बी. यू. भंडारी ग्रीन सोसायटी, धानाेरी, मूळ रा. उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. याबाबत उपनिरीक्षक नीलेश पाटील यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गीता रेड्डी देहविक्रय करते. २० ऑक्टोबर रोजी चौहान हा रेड्डीला भेटला. त्यांच्यात पैशांवरुन वाद झाले. त्यानंतर त्याने तिच्या डोक्यात लाकडी दांडके मारुन खून केला. तिचा मृतदेह बी. यू. भंडारी सोसायटीजवळ मोकळ्या जागेत साचलेल्या कचऱ्यात फेकून दिला. दरम्यान, कचऱ्यात एक महिला मृतावस्थेत पडल्याची माहिती रहिवाशांनी पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविली. चौकशीत रेड्डी पुणे स्टेशन परिसरात देहविक्रय करत असल्याची माहिती मिळाली. तपासात चौहानने तिचा खून केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने चौहानला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. वरिष्ठ निरीक्षक मंगेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पद्मराज गंपले, सुडगे, महेश भोसले आणि तपास पथकाने ही कामगिरी केली.






