संग्रहित फोटोे
कोल्हापूर : राज्यासह देशभरात अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. दररोज वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घडना उघडकीस येत असतात. अपघातात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच आता कोल्हापूर जिल्ह्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. राधानगरी मार्गावरील कौलव ते सिरसे दरम्यान झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आयशर टेम्पोने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेमुळे घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो राधानगरीकडून कोल्हापूरकडे अतिवेगाने जात होता. त्याचवेळी भोगावतीकडून राधानगरीकडे चार जण मोटारसायकलवरून जात होते. कौलव येथील श्री दत्त मंदिराजवळ टेम्पो चुकीच्या दिशेने आल्यामुळे त्याने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील श्रीकांत बाबासो कांबळे व त्यांची पुतणी कौशिका सचिन कांबळे (दोघेही रा. तरसांबळे) यांचा जागीच मृत्यू झाला. श्रीकांत यांची बहिण दिपाली गुरुनाथ कांबळे आणि तिचा मुलगा अथर्व गुरुनाथ कांबळे (रा. शेंदूर, ता. कागल) गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान अथर्वचा मृत्यू झाला.
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे कोल्हापूर – राधानगरी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. अपघात ठिकाणी बघायची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती.