संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरात घरफोड्या, मोबाईल हिसकावने, पीएमपी प्रवासात चोऱ्या आणि स्वारगेट एसटी स्थानकात प्रवासी नागरिकांच्या किंमती ऐवजावर डल्ला मारणाऱ्या टोळीचा उच्छाद वाढला असून, पुन्हा स्वारगेट बस स्थानकात महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी दागिने चोरल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मूळच्या कोल्हापुरच्या आहेत. शनिवारी त्या सकाळी अकराच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानकातून कोल्हापुरकडे निघाल्या होत्या. त्यांच्याबरोबर पती आणि जावई होते. बस फलाटावर थांबल्यानंतर प्रवाशांची गर्दी झाली. बसमध्ये प्रवेश करताना चोरट्याने त्यांच्या पिशवीतून दहा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. बसमध्ये चढल्यानंतर त्यांनी पिशवीची पाहणी केली. तेव्हा दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील तपास करत आहेत.
दिवाळीनंतर स्वारगेट, शिवाजीनगर एसटी स्थानक परिसरात प्रवाशांकडील ऐवज चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एसटी स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या घटनेत चोरट्यांनी एसटी प्रवाशांकडील लाखो रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे.
हे सुद्धा वाचा : चोराच्या उलट्या बोंबा! चोरी करायला गेला अन् पहिल्या मजल्यावरुन पडला
महिलांकडील मोबाइल लंपास
पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यानी धुमाकूळ घातला असून, पादचारी महिलांकडील दागिने तसेच मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. प्रभात रस्त्यावरील हिरवाई उद्यान येथे दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेकडील मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील वाघोली भागात दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले, तर हडपसरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न झाला. सातत्याने या घटना घडत असताना पोलिसांना मात्र या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १५ परिसरातील सोसायटीत राहायला आहेत. त्या बुधवारी सायंकाळी प्रभात रस्ता परिसरातील हिरवाई उद्यान परिसरात चालायला गेल्या होत्या. तेथून त्या घरी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मोबाइलवर वहिनीचा फोन आला. त्यामुळे त्या मोबाइलवर बोलत पायी चालत असताना गल्ली क्रमांक १५ परिसरातील सिंबायोसिस शाळेसमोर महिलेच्या हातातील २० हजारांचा मोबाइल चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. चोरट्यांनी हेल्मेट परिधान केले होते. सहायक पोलीस फौजदार राजेंद्र मारणे तपास करत आहेत.