संभाजीनगरमध्ये मंदिरासमोरच भीषण अपघात; कारने सहा जणांना चिरडले(संग्रहित फोटो)
पुणे : सिंहगड रोडवरील वडगाव उड्डाणपुलावर भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात त्याच्यासोबतचा दुचाकीस्वार तरुण जखमी झाला आहे. तसेच त्याचं भरधाव ट्रकने उड्डाणपुलावरुन निघालेल्या आणखी दोन कारला धडक दिली आहे. अपघातात दोन कारचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
किरण पवार (वय २५, रा. श्रमसाफल्य कॉलनी, कर्वेनगर) असे मृत्यू झलेल्या सहप्रवासी तरुणाचे नाव आहे. तर दुचाकीस्वार यश जयप्रकाश किरदत्त (वय २५, रा. श्रमसाफल्य कॉलनी, कर्वेनगर) गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ट्रकचालक महंतेश श्रीकांत अंदोडगी (वय ३७, रा. गोलसर, ता. इंडी, जि. विजयपुर, कर्नाटक) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत यश किरदत्त याने सिंहगड रोड पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकीस्वार यश किरदत्त आणि त्याचा मित्र किरण पवार वडगाव उड्डाणपुलावरुन रविवारी (२२ जून) पहाटे सव्वापाचच्या सुमारास निघाले होते. त्यावेळी भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातानंतर भरधाव वेगात ट्रकचालक पसार झाला. त्यावेळी उड्डाणपुलावरुन निघालेल्या दोन कारला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईंगडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातात गंभीर जखमी झालेला दुचाकीस्वार यश अणि त्याचा मित्र किरण यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच किरण याचा मृत्यू झाला होता. पसार झालेला ट्रकचालक अंदोडगीला ताब्यात घेतले. रात्री उशीरा त्याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक मालुसरे अधिक तपास करत आहेत.
उड्डाणपुलावर तिसरा अपघात
वडगाव उड्डाणपुलावर दोन महिन्यांपूर्वी मित्रांसोबत पार्टी करुन निघालेल्या कारचालकाने दुचाकीला धडक दिली होती. अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर भरघाव कार उड्डाणपुलावरुन रस्त्यावर कोसळली होती. अपघातात चालकासह त्याच्याबरोबर असलेले मित्र जखमी झाले होते. यापूर्वी वडगाव उड्डाणपुलावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
विमाननगर परिसरात रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मन्सूर अन्वर आलम (वय ५४, रा. ससून क्वार्टर, सोमवार पेठ) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत मन्सूर आलम यांचा मुलगा मोहम्मद रिहान मन्सूर आलम (वय २६) याने विमाननगर पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी रिक्षाचालकावर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. मन्सूर आलम हे शनिवारी (२१ जून) रात्री सव्वाआठच्या सुमारास विमननगर भागातून निघाले होते. त्यावेळी सिंबायोसिस महाविद्यालय प्रवेशद्वार क्रमांक एकसमोर भरधाव रिक्षाने मन्सूर यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या मन्सूर यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी रिक्षाचालक जालिंदर बबन शेळके (वय ५७, रा. कळस, आळंदी रस्ता) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार धेंडे तपास करत आहेत.