संग्रहित फोटो
पुणे : पिंपरी-चिंचवड अन् पुणेकर वैष्णवी आत्महत्याप्रकरण विसरलेले नसतानाच पुण्यात एका नवविवाहितेने सासरच्या जाचाला अन् त्यांच्या पैशांच्या मागणीला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विवाह होऊन वर्ष पुर्ण होत असतानाच सासरच्यांकडून कंपनीसाठी २० लाख रुपये आणण्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. त्यामुळे तिने सतत होणाऱ्या छळाला कंटाळून शेवटी गळफास लावून आत्महत्या केली.
स्नेहा विशाल झेंडगे (वय २७) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी वडील कैलास मच्छिंद्र सावंत (वय ५५, रा. कर्देहळी, जि. सोलापूर) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी पती विशाल झेंडगे, सासरे संजय झेंडगे, सासू विठाबाई झेंडगे, दीर विनायक झेंडगे, ननंद तेजश्री थिटे आणि इतर दोघे अशांवर भारतीय न्याय संहिता कलम १०८, ८५, ११५ (२), ३५२, ३५१ (२)(३), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
पोलीसांच्या माहितीनुसार, स्नेहा आणि विशाल यांचा २ मे २०२४ रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवसांत त्यांनी स्नेहा हिला कंपनी चालविण्यासाठी माहेरून २० लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावला. पैशासाठी स्नेहाला शिवीगाळ व मारहाण आणि मानसिक छळ सुरू केला. सतत होणाऱ्या या छळामुळे स्नेहाने यापूर्वी पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र आरोपी संजय झेंडगे यांचा साडू भाऊसाहेब कोल्हाळने तिला दमदाटी करून तक्रार मागे घेण्यास भाग पाडले होते. तक्रार मागे घेतल्यानंतरही छळ सुरू राहिला. शेवटी या छळाला कंटाळून ९ ऑगस्ट रोजी रात्री स्नेहाने आंबेगाव बुद्रुक येथील तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या; पोलिसांनी सापळा रचून पकडले
पहिली मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ
पहिली मुलगी झाल्याच्या कारणावरून त्रास देणार्या व आईकडून घरखर्चाला पैसे आण म्हणणार्या सासरच्यांवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पती सचिन चव्हाण याच्यासह त्याच्या आई वडीलांवर कौटुंबिक छळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २९ वर्षीय विवाहित महिलेने तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१३ पासून ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान कोंढव्यातील सिध्दार्थनगर येथे घडला.
हे सुद्धा वाचा : संतापजनक! भाडे देऊ नका, फक्त मला…; लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरूणीचा विनयभंग