संग्रहित फोटो
कराड : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता कराडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कासेगाव (ता. वाळवा) येथील युवकास चुलत बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून सात जणांनी अपहरण करून लोखंडी पाईप, दांडक्याने बेदम मारहाण केली होती. यामध्ये युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी ही घटना घडली होती. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
रहिमतुल्ला सलिम आतार (वय २७) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत रहिमतुल्लाच्या भावाने फिर्याद दिली असून, सुदाम मोहन पवार, (वय २७), राकेश रामदास पाटील, (वय २६), अमर सुरेश खोत, (वय २७), विराज युवराज तोडकर, (वय २६), उमेश रविंद्र पाटील, (वय २८), विशाल हणमंत शिंदे, (वय २३) व ऋषिकेश धनाजी तोडकर, (वय २६, सर्व रा. कासेगाव, ता. वाळवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांकडून संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली हत्यारे, तसेच चारचाकी वाहनांचा पोलीस शोध घेत असून, लवकरच हत्यारे व वाहने जप्त करण्यात येतील. त्याचबरोबर यामध्ये आणखी काही लोकांचा समावेश आहे का? याचीही माहिती पोलीस घेत असल्याचे कराड तालुका ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिली. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सखाराम बिराजदार अधिक तपास करत आहेत.