संग्रहित फोटो
इचलकरंजी : वारसा नोंद करण्यास गट खुला करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्विकारताना शहापुर येथील तलाठी आणि कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहात सापडले आहेत. गणेश विष्णुपंत सोनवणे (वय ३२ रा. मगदुम कॉलनी जयसिंगपूर) असे तलाठ्याचे नाव असून नेताजी केशव पाटील (वय ४५ रा. म्हसोबा रोड दर्गा गल्ली शहापुर) असे कोतवालचे नाव आहे. स्टेशन रोडवरील गुरुचित्र मंदिर परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
तक्रारदाराने वारस नोंद करण्यासाठी शहापूर तलाठी कार्यालयात कागदपत्रे दिली होती. कागदोपत्री नाव नाेंदणीसाठी तक्रारदार शहापूरचे तलाठी गणेश सोनवणे आणि कोतवाल नेताजी पाटील यांच्याकडे पाठपुरावा करत होते. या नोंदीसाठी गट नं. ७२९ हा ब्लॉक असलेला गट खुला करण्यासाठी कोतवाल पाटील याने तलाठी सोनवणे यांच्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती तक्रारदाराने सुरुवातीला १० हजार रुपये आणि काम झाल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचे ठरले होते. तर लाच मागितल्याबद्दल तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोर्टलवर ३ नोव्हेंबर रोजी तक्रार नोंदवली होती. त्या अनुषंगाने कोल्हापुर लाचलुचपत विभागाच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी तलाठी कार्यालयात शहानिशा केली होती.
गुरुवारी स्टेशन रोडवरील गुरु चित्रमंदिर नजीकच्या चहा टपरीवर तक्रारदाराकडून १० हजाराची लाच स्वीकारताना तलाठी सोनवणे आणि कोतवाल पाटील या दोघांना पथकाने रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधिक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, सुधील पाटील, कृष्णा पाटील, प्रकाश चौगुले सहभागी झाले होते.
हे सुद्धा वाचा : प्रकरणी पार्थ पवारांच्या भागीदारांवर गुन्हा दाखल; अधिकारीही अडचणीत
दोघांच्या घरांची झाडाझडती
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर तलाठी सोनवणे आणि कोतवाल पाटील या दोघांच्याही घरांची झाडाझडती घेतल्याचे सांगण्यात आले. दाेन्ही संशयितांना शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणल्यानंतर हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील गावातील तलाठी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती.






