सौजन्य - सोशल मिडीया
गडहिंग्लज : अपघातप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातील वाहन सोडवण्यासाठी तक्रारदारकडून ६० हजारांची मागणी करून तडजोडीअंती ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना गडहिंग्लज पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नीता शिवाजी कांबळे (वय ५७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
तक्रारदार यांच्या मुलाच्या गाडीचा अपघात झाला होता. या गुन्ह्याचा तपास कांबळे यांच्याकडे होता. गुन्ह्यातील वाहन सोडवण्यासाठी तक्रारदार यांनी कांबळे यांना विनंती केली. यासाठी ६० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगून यातील कलमे कमी करण्याचे आश्वासन कांबळेंनी दिले होते. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ऑनलाइन तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केली असता लाचेच मागणी केल्याचे सिद्ध झाले.
शनिवारी कांबळे यांना चाळीस हजार रुपये रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. गडहिंग्लज शहरातील केडीसी कॉलनीतील त्यांच्या घराचीही झडती घेण्यात आली. कांबळेंची नेमणूक गडहिंग्लज पोलिस ठाण्याकडे असली, तरी बहुतांश वेळा त्या निर्भया पथकात कार्यरत असत. निवृत्तीच्या अंतिम टप्प्यात असताना त्यांना कारवाईला सामोरे जावे लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
दोन महिला पोलिसांवर कारवाई
गडहिंग्लज पोलिस ठाण्याकडे लाच घेताना सलग दुसरी महिला पोलिस कर्मचारी सापडली आहे. सहा ते सात महिन्यांपूर्वी महिला कॉन्स्टेबलला दोन हजारांची लाच घेताना पकडले होते. तब्बल ४० हजारांची लाच घेताना महिला पाेलिस कर्मचारी जाळ्यात अडकली.
न्यायालयातील दोन लिपिकांना सापळा लावून पकडले
न्यायालयाच्या आदेशानुसार भाडेकरुच्या ताब्यातून सदनिकेचा ताबा मिळवून दिल्यानंतर सदनिका मालकाकडून ३५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या न्यायालयातील लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले आहे. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी न्यायालयातील लिपिक रवींद्र हिंदुराव पवार (वय ४०) आणि अमित बबन भुसारी (वय ३४) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रोटेक्शन मनी घेणाऱ्या पोलिसाचे निलंबन
पुणे शहरातील अवैध धंद्याविरोधात वारंवार पोलीस आयुक्त अमितेश कुमार कठोर भूमिका घेत आहेत. विशेष करून हुक्काबार तसेच पब याबाबत विशेष लक्ष दिले जात असतानाच गेल्या काही दिवसाखाली पोलीस उपनिरीक्षकाने हुक्का पार्लरला परवानगी देऊन त्याच्याकडून प्रोटेक्शन मनी घेतल्याचा प्रकार समोर आला असून, आयुक्तांनी या उपनिरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन केले आहे. त्यासोबतच अशा अवैध धंद्यांना सरंक्षण देऊन त्यांच्याकडून वसुली केल्यास तुमची खैर नाही, असेही सूचित केले आहे. शरद निवृत्ती नवले असे या श्रेणी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत.