संग्रहित फोटो
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कुटूंबियासोबत एका व्यक्तीला लाकडी दांडके तसेच लोखंडी रॉड घेऊन मारहाण करण्याचा प्रयत्न तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर माझीही तक्रार घ्या म्हणत एका पोलीस कर्मचाऱ्यानेच पोलीस ठाण्यात पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. तत्पुर्वी याप्रकरणात संबंधित कर्मचाऱ्याला पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. विजय लक्ष्मण जाधव असे पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याच्या निलंबनाचे आदेश पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी दिले आहेत.
विजय जाधव हे पोलीस मुख्यालयात नेमणूकीस होते. ते राहण्यास विश्रांतवाडी परिसरात आहेत. दरम्यान, काही वाद विवादातून विजय त्यांचा भाऊ, बहिण, तिचे पती व इतर दोन अशांनी बेकायदेशीर जमाव जमवून येथील एका व्यक्तीला हातात लोखंडी रॉड व लांकडी दांडके घेऊन एका व्यक्तीला शिवीगाळ करून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी ओंकारसिंग गुलचंदसिंग भोंड यांच्या तक्रारीवरून विश्रातंवाडी पोलिसांत या सर्वांवर गुन्हा नोंद केला होता.
आपल्यावर व कुटूंबावर गुन्हा नोंद झाल्यानंतर विजय जाधव हे देखील (दि. २३ फेब्रुवारी) विश्रांतवाडी पोलिसांत गेले. माझी देखील तक्रार घ्यावी, असे सांगितले. पण, काही कारणास्तव तक्रार घेण्यात येत नव्हती. तेव्हा आमची तक्रार का घेत नाही असे म्हणत त्याने पोलीस ठाण्यातच पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा व आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. याप्रकरणात वरिष्ठांकडून त्याची चौकशी सुरू करण्यात आली. नंतर पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी त्याला पोलीस खात्यातून निलंबित केले आहे.
पुतण्याने केला चुलत्याचा खून
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. आर्थिक वादविवादातून पुतण्याने चुलत्यावर लोखंडी हत्याराने वार करून त्यांचा खून केल्याची घटना गेल्या काही दिवसाखाली पाषाण येथे घडली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेतले आहे. महेश जयसिंगराव तुपे (वय.५६,रा. पाषाण) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महेश यांचा मुलगा वरद तुपे (वय १९) याने तक्रार दिली आहे. त्यावरून शुभम महेंद्र तुपे (वय २८), रोहन सूर्यवंशी (वय २०) आणि ओम बाळासाहेब निम्हण (वय २०, रा. सर्व पाषाण) यांना अटक केली आहे.