संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरात सोनसाखळी चोरट्यांनी ऐन मकरसंक्रांतीच्या दिवशी महिलांना टार्गेट केलेले असताना चतु:शृंगी आणि वानवडीत देखील दोन घटना घडल्याचे समोर आले आहे. तर यासोबतच येरवड्यात एकाला चाकूच्या धाकाने लुटण्यात आले आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात 24 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील २ चोरट्यावर गुन्हा नोंदवला आहे. ही घटना मकरसंक्रांतीच्या दिवशी घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार या वडारवाडी परिसरात राहण्यास आहेत. सेनापती बापट रस्त्याने त्या पहाटे साडे पाचच्या सुमारास पायी जात असताना विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीवरील चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपयांची सोन साखळी हिसकावून पोबारा केला. त्यांनी आरडाओरडा केला, परंतु चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. तर वानवडीमधील घटना तीन दिवसांपूर्वी म्हणजे 13 जानेवारी रोजी घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांत 44 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. दुपारी बाराच्या सुमारास ते घोरपडी बाजार आले होते. तेव्हा त्यांच्या विरुद्ध दिशेने येऊन गळ्यातील सोन साखळी हिसकावून नेली.
हे सुद्धा वाचा : मित्रांमध्ये चेष्टामस्करी; गावठी पिस्तूलातून गोळी सुटली अन्…
येरवड्यात चाकूच्या धाकाने लुटले…
पुणे शहरात सोनसाखळी चोरट्यांबरोबर आता लूटमार करणारे देखील ऍक्टिव्ह झाले असून, येरवडा भागात एकाला चाकूच्या धाखाने लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात 34 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. हा प्रकार रात्री पावणे नऊ सुमारास घडला आहे.
पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?
पुण्यात सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
५८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला
कौटुंबिक कार्यक्रमासाठी हैदराबाद येथे गेलेल्या तरुणाच्या घरी चोरट्यांनी घरफोडी करून ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना कोंढवा बुद्रुक येथील काकडे वस्तीत घडली आहे. याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सहा ते १२ जानेवारी या काळात घडली. तक्रारदार तरुणाच्या बहिणीच्या सासरी कार्यक्रम होता. त्यासाठी तरुण व त्याचे कुटुंबीय हैदराबादला गेले होते. तेथून परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक किसन राठोड अधिक तपास करीत आहेत.