संग्रहित फोटो
पुणे : पुण्यातून एख मोठी बातमी समोर आली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मित्रांमध्ये चेष्टामस्करी सुरू असताना पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाकडून निष्काळजीपणे पिस्तूलातून गोळी झाडली गेली. झाडली गेलेली गोळी तरुणाला लागल्याने तो गंभीररित्या जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे. रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली असून, पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
करण भारत गरजमल (वय १९, रा. आंबेगाव बुद्रुक) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, निलेश उर्फ बाब्या जाधव याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह जाधव याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, करण व निलेश दोघेही मित्र आहेत. बुधवारी रात्री दोघे व त्यांचा एक अल्पवयीन मित्र असे तिघे साडे नऊच्या सुमारास फ्रेंड्रस पार्क परिसरातील एका मोकळ्या जागेत बसलेले होते. तेव्हा करण हा निलेश याची चेष्टामस्करी करत होता. चेष्टा मस्करी अति झाल्यानंतर त्यांच्यात तू-तू मैं-मैं झाली. त्याचवेळी निलेशकडे असलेल्या गावठी पिस्तूलातून गोळी झाडली गेली. गोळी करण याला लागली आणि तो गंभीररित्या जखमी झाला. काही तासानंतर भारती विद्यापीठ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. निलेश याने पिस्तूल कोठून आणले याबाबत पोलीस तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : कोल्हापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; बंद फ्लॅट फोडून सहा लाखांचा मुद्देमाल लंपास
दगडाने ठेचून मुलाचा खून
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं गेल्या काही दिवसाखाली नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.