बुलडाणा : मेरा शैक्षणिक प्रशासनाच्या उडवाउडवीच्या कारभाराला कंटाळून एका पालकाने चक्क शाळेच्या आवारातच विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना गुरुवारी (दि. २५) मेरा बुद्रुक येथे घडली. शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय परिसरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
गावातीलच सय्यद मुस्ताक सय्यद इसा यांचा मुलगा पुणे येथे उच्च शिक्षण घेत आहे. त्याने अलीकडेच एनडीएची परीक्षा देण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, शाळेकडून चार महिन्यांपासून नावातील दुरुस्ती न झाल्याने त्याची परीक्षा द्यायची संधी हुकली. यामुळे मुलगा हताश झाला. याच कारणामुळे हतबल झालेल्या पालक सय्यद मुस्ताक यांनी शाळेच्या आवारातच विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने शाळेतील रामदास पडघान यांनी वेळीच धाव घेत विषारी द्रव्याची बाटली हिसकावून घेतली आणि मोठा अनर्थ टळला. या प्रकरणामुळे शाळेच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पैशांची मागणी केल्याचा आरोप यामुळे संतप्त पालकांचा रोष वाढला आहे.
हेदेखील वाचा : बुलडाण्यात 21 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन
दरम्यान, या घटनेनंतर संतप्त पालक सय्यद मुस्ताक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘मी चार महिन्यांपासून शाळेच्या प्राचार्याकडे चकरा मारत आहे. परंतु, त्यांनी आजवर फक्त उडवाउडवीची उत्तरे दिली. अमरावतीला जाण्यासाठी पैशांची मागणी केली. मी एक सर्वसाधारण पालक असून, पैसे देऊ शकलो नाही. माझ्या मुलाचे शैक्षणिक नुकसान झाले. माझ्या मुलाची एनडीए परीक्षा हुकली. म्हणूनच मी हे टोकाचे पाऊल उचलले’.
वाईतही तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न
सुसंस्कृत आणि ऐतिहासिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. शहरातील तरुण पिढी ऑनलाईन गेमिंग आणि जुगाराच्या विळख्यात अडकून बरबाद होत असून, लाखो रुपयांची उधळपट्टी करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या खेळात पैसे गमावल्याच्या नैराश्येतून काही तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.