अंकिता भंडारी हत्या प्रकरणात तिन्ही आरोपी दोषी (फोटो सौजन्य-X)
Ankita Bhandari Case In Marathi : उत्तराखंडमधील बहुचर्चित अंकिता भंडारी हत्या प्रकरणातील सुमारे दोन वर्षे आणि आठ महिने हे प्रकरण कोर्टात सुरु होतं. अखेर आज (30 मे) कोर्टाने या प्रकरणात अंकिता भंडारीला न्याय मिळून दिला. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना दोषी म्हणून घोषित करण्यात आले. अंकिता भंडारी हत्या प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. ज्या हॉटेलमध्ये अंकिता रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती त्या हॉटेलच्या मालकावर १९ वर्षीय अंकिता भंडारीच्या हत्येचा आरोप आहे. अंकिता भंडारी कोण होती आणि या प्रकरणात आतापर्यंत काय घडले आहे , जाणून घ्या सविस्तर बातमी…
अंकिता भंडारी श्रीनगर गढवाल येथील रहिवासी होती आणि ती एका सामान्य कुटुंबातील होती. घराची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ती नोकरीच्या शोधात बाहेर पडली. तिला ऋषिकेशमधील वनंतरा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी मिळाली पण त्यानंतर काही दिवसांनी तिची हत्या करण्यात आली. अंकिताची १८ सप्टेंबर २०२२ रोजी तिची हत्या करून तिचा मृतदेह कालव्यात फेकून देण्यात आला.
या हत्येनंतर रिसॉर्ट मालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी वनंतरा रिसॉर्टचे मालक पुलकित आर्य, रिसॉर्टचे व्यवस्थापक सौरभ भास्कर आणि सहाय्यक व्यवस्थापक अंकित उर्फ पुलकित गुप्ता यांना अटक केली होती. अंकिताची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह चिला कालव्यात फेकण्यात आला होता. आरोपींनी अंकित भंडारीची हत्या करून मृतदेह कालव्यात फेकल्याची कबुली दिली होती. अंकिताच्या शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू बुडून झाल्याचे आणि तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा असल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, अंकिता भंडारी हत्या प्रकरणात कोटद्वारच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश रीना नेगी यांनी पुलकित आर्य, सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता यांना दोषी ठरवले आहे. तिघांचीही शिक्षा अद्याप जाहीर झालेली नाही. उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या अंकिता भंडारी यांची १८ सप्टेंबर २०२२ रोजी हत्या करण्यात आली होती.
सोमवारी बचाव पक्ष आणि सरकारी वकिलांमधील अंतिम युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ३० मे रोजी निकाल राखून ठेवला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, एसआयटीने ५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये एकूण ९७ साक्षीदारांची नावे होती. यापैकी ४७ साक्षीदारांना सरकारी वकिलांनी न्यायालयात हजर केले. एसआयटीने न्यायालयात दाखल केलेल्या ५०० पानांच्या आरोपपत्रात पुलकित आर्यने त्याचे दोन कर्मचारी सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता यांच्यासह ही हत्या केल्याचे म्हटले आहे.
या खटल्याची सुनावणी दोन वर्षे आठ महिने चालली आणि या काळात तपास अधिकाऱ्यासह ४७ साक्षीदारांना सरकारी वकिलांनी हजर केले. अंकिताचा पुलकितशी वाद झाला, त्यानंतर भास्कर आणि गुप्ता यांच्यासह पुलकितने अंकिताला ऋषिकेशमधील चिला कालव्यात ढकलल्याचा आरोप आहे.
अंकिताचा मृतदेह कालव्यात सापडल्यानंतर पोलिसांनी तिघांनाही अटक करून तुरुंगात पाठवले. पुलकित हा भारतीय जनता पक्षाचे (भाजप) तत्कालीन नेते विनोद आर्य यांचा मुलगा आहे. हे प्रकरण उघडकीस येताच पक्षाने आर्य यांना पक्षातून काढून टाकले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर स्थानिक लोक रस्त्यावर उतरले आणि लोकांना शांत करण्यासाठी राज्य सरकारला या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करावे लागले. सरकारने आरोपींना कठोर शिक्षा देण्याची घोषणाही केली.