dance bar (फोटो सौजन्य-pinterest)
भाईंदर, काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील मिरागाव येथे चालणाऱ्या ‘अमर पॅलेस उर्फ मानसी अंऑर्केस्ट्रा बार’वर पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या बारवर छापा टाकत अश्लील डान्स सुरू असल्याचे उघड केले. कारवाईदरम्यान बारमधून १०,५०० रुपये जप्त करण्यात आले असून, १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
PCMC Crime: किरकोळ वादातून मारहाण; बॅटने हल्ला करून महिलेस गंभीर दुखापत
विशेष म्हणजे, या बारवर यापूर्वीही विविध नियमांचे उल्लंघन करून एक-दोन नव्हे, तर तब्बल १४ गुन्हे दाखल झाले आहेत. तरीही आजपर्यंत या बारचा परवाना निलंबित करण्यात आलेला नाही. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
सदर प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश बुन्हाडे करत आहेत. आगामी काळात या बारविरोधात प्रशासन कोणती भूमिका घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
एकूण १५ गुन्हे; बार सुरूच
या बारविरोधात आतापर्यंत १५ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये नियमांचे उल्लंघन, अश्लील डान्स, परवान्याचे उल्लंघन आदींचा समावेश आहे. इतके गंभीर प्रकार घडूनही बार आजही बिनधास्त सुरू असल्याने, स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. बारमालकाच्या राजकीय किंवा पोलीस पाठबळामुळेच कारवाई होत नसल्याचे आरोप होत आहेत.
ठोस कारवाईची मागणी
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून आता जोरदार मागणी केली जात आहे की, अशा बेकायदा व्यवसायांवर केवळ छापे टाकून गुन्हे दाखल करण्यात न येता, परवाने तात्काळ रद्द करावेत आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी.
पोलिस असतानाही डान्स सुरू असल्याने आश्चर्य
या बारमध्ये कोरोनाच्या काळातही डान्स सुरू असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी पूर्वीही येथे छापे टाकले असले, तरी ठोस कारवाई टाळण्यात आली होती. इतकेच नाही तर, कारवाईच्या वेळी काही पोलीस कर्मचारी जवळच ड्युटीवर बसलेले असतानाही, बेधडकपणे अश्लील डान्स सुरू होता. त्यामुळे पोलीस आणि बारमालक यांच्यातील संबंधांवर शंका उपस्थित केली जात आहे.
कारवाईनंतरही ताठर भूमिका घेतली नाही
७ ऑक्टोबर २०२४ रोजी या बारवर करण्यात आलेल्या कारवाईत १३ तरुणी डान्स करताना आढळून आल्या होत्या. या कारवाईतही मोठ्या प्रमाणावर पैसे उधळले जात असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, या घटनेला सहा महिने उलटल्यानंतर देखील परवाना निलंबनाची फक्त शिफारस करण्यात आली आहे. संबंधित अहवाल पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्याकडे सादर केला आहे.