घरात शिरून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न; कुटुंबियांनी विरोध करताच मारहाण, पण शेजारी धावून आले अन्... (संग्रहित फोटो)
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडत आहेत. असे असताना नागपुरात तरुणीच्या अपहरणाचा डाव शेजारच्यांमुळे हाणून पडला. कुटुंबियांनी विरोधही केला होता. मात्र, त्यांना मारहाण करण्यात आली. पण, जेव्हा शेजारचे एकत्र आले तेव्हा या टोळक्याने तेथून पळ काढला.
आरोपी तरुणाने आपल्या तीन साथीदारांसोबत घरात घुसून एका तरुणीला जबरीने उचलून नेण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी विरोध केला असता आरोपीने तरुणीचा भाऊ आणि आईला मारहाण केली. ही खळबळजनक घटना लकडगंज पोलिस ठाण्यांतर्गत क्वेटा कॉलनी परिसरात घडली. आसपासचे लोक मदतीला धावले असता आरोपी तरुणाचे साथीदार पळून गेले. मात्र, नागरिकांनी आरोपी तरुणाला पकडून चांगला चोप दिला. त्यानंतर मोठ्या संख्येत नागरिक त्या तरुणाला घेऊन ठाण्यात पोहोचले.
आमदार कृष्णा खोपडेही ठाण्यात पोहोचले आणि आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
पीडित तरुणीची आरोपीसोबत होती मैत्री
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची आरोपी तरुणाशी मैत्री होती. मात्र, त्याच्या स्वभावामुळे तिने त्याच्यापासून दुरावा करत बोलचाल बंद केली होती. यामुळे आरोपी तरुण चिडलेला होता. रविवारी रात्री तो आपल्या तीन साथीदारांसह लाल रंगाच्या कारने तरुणीच्या घरापुढे आला. त्याचे साथीदार खालीच उभे होते आणि तो तिच्या घरी गेला.
भावाने दार उघडताच दिला धक्का
भावाने दार उघडताच त्याला धक्का देऊन खाली पाडले. आई समोर आली असता तिलाही मारहाण केली. खाली तीन साथीदार उभे असल्याची माहिती दिली. त्यानंतर तो जबरीने तरुणीला घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागला. आरडा-ओरड झाल्याने स्थानिक नागरिक गोळा झाले. प्रकरण चिघळल्याचे पाहून त्याचे खाली उभे तिन्ही साथीदार कारमध्ये बसून फरार झाले. लोकांनी आरोपी तरुणाला पकडून चांगला चोप दिला.
पोलिस ठाण्यात तणावाचे वातावरण
आरोपी तरुणाला लकडगंज ठाण्यात नेण्यात आले. पाहता-पाहता शेकडो लोक जमा झाले. घटनेची माहिती मिळताच आमदार खोपडेही ठाण्यात पोहोचले. नागरिकांनी हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचे सांगून तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. जवळपास एक तासपर्यंत ठाण्याचे वातावरण तणावपूर्ण होते. खोपडे यांनी पोलिस आयुक्त आणि डीसीपी राहुल मदने यांच्याशी चर्चा केली. योग्य कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर लोकांचा राग शांत झाला.