संग्रहित फोटो
पुणे : बी. जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (ससून) केलेल्या फर्निचरच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी कार्यालयीन वरिष्ठ सहाय्यक आणि कार्यालयीन अधीक्षक यांना १ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. जयंत पर्वत चौधरी ( वय ४९, वरिष्ठ सहाय्यक), सुरेश विश्वनाथ बोनवळे ( वय ५३, कार्यालयीन अधीक्षक) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. याबाबत ३२ वर्षीय व्यावसायिकाने तक्रार दिली आहे.
तक्रारदार यांचा फर्निचर सप्लायरचा व्यवसाय आहे. २०२३ मध्ये तक्रारदार यांनी वीस लाख रुपये किमतीचे फर्निचर बी. जे. शासकीय महाविद्यालयास दिले होते. तक्रारदार यांच्या एकूण बिलांपैकी दहा लाख रुपयांचे बिल सादर व मंजूर करण्याकरिता बोनवळे व चौधरी यांनी १३ टक्के प्रमाणे एक लाख तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. १ एप्रिल रोजी याची तक्रार एसीबीकडे प्राप्त झाली होती. एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली. त्यात दोघांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
बोनवळे यांनी लाचेची रक्कम चौधरी यांच्याकडे देण्याचे सांगितले होते. बुधवारी रात्री उशिरा तक्रारदार यांच्याकडून शासकीय महाविद्यालयाच्या कार्यालयात चौधरी यांनी एक लाख रुपये रक्कम स्वीकारली. यावेळी एसीबीने दोघांना रंगेहात पकडले. त्यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांना 5 लाखांची लाच स्वीकारणं भोवलं
कराडमधील सोमवार पेठ येथील व्यावसायिकास बांधकाम परवाना देण्यासाठी दहा लाखांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाच लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना कराड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्यासह नगररचना विभागाचे सहाय्यक नगररचनाकार व बांधकाम विभागाच्या कनिष्ठ लिपीकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारच्या पथकाने सोमवारी रात्री कारवाई केली आहे. कराड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे, नगररचना विभागातील सहाय्यक नगररचनाकार स्वानंद दिलीप शिरगुप्पे (सध्या रा. कराड, मूळ रा. कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर), बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक तौफीक कय्यूम शेख (वय ४०, रा. कार्वे नाका, कराड) यांच्यासह अजिंक्य अनिल देव अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.