(फोटो- टीम नवराष्ट्र)
बारामती: पोलीस असल्याचे सांगून भंगार व्यावसायिकास लुटणारी टोळी जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांना यश आले आहे. या टोळीकडून एक चारचाकी कार व दोन गावठी पिस्तूल असा एकूण २ लाख ५१ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील फिर्यादी कुतुबुद्दीन सुभेदार शहा( वय ४० वर्षे, व्यवसाय भंगार खरेदी-विक्री, रा. स्प्रिंग व्हिलेज, तांदुळवाडी, बारामती ता. बारामती) यांचे बारामती औद्योगिक वसाहत परिसरातील वंजारवाडी येथील लोखंडे वस्ती येथे भंगार खरेदी-विक्रीचे दुकान असून दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजी फिर्यादी शहा हे दुकानावर असताना चार अनोळखी इसमांनी त्यांचेकडील पांढरे रंगाचे आय-२० कार मधून येवून भंगार व्यावसायिकास त्यांचेकडील कार विक्री करावयाची आहे, असे सांगितले.
कारला कोणताही नंबर नसल्याने फिर्यादीने कार खरेदी करण्यास नकार दिला .नंतर आरोपींनी पोलीस असल्याची बतावणी करून शहा यांना आय-२० कारमध्ये बसवून घेतले. त्यांच्या जवळील मोबाईल व आठ हजार रूपये रोख रक्कम काढून घेतली, तु चोरीचा माल खरेदी केला आहे, पंधरा लाख रूपये दे नाहीतर, तुला भिगवण पोलीस स्टेशनला घेवून जाऊ, असे आरोपींनी सांगितले .नंतर फिर्यादी शहा यांनी आरडाओरड केला .तेव्हा आरोपीपैकी एकाने पिस्तुल काढून पिस्तुलचा धाक दाखवून शहा यांना ओरडायचे नाही असे सांगितले, त्यानंतर त्यांना दौंड-नगर हायवे रोडने घेवून जावून चिखली गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ सोडून दिले. या प्रकाराबाबत फिर्यादी शहा यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला .
गुन्हयाचा प्रकार हा गंभीर असून पोलीस बतावणी करून फिर्यादीस लुटण्यात आले होते. सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सुचना करून रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणेबाबत मार्गदर्शन केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेची तीन तपास पथके तयार करण्यात आली. फिर्यादीकडून आरोपीचे, कारचे वर्णन प्राप्त करून घेतले. तसेच फिर्यादीस ज्या रोडने नेण्यात आले त्या रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पांढरे रंगाची आय-२० कार आढळून आली. दरम्यान पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्यास सुरुवात केली असता, गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, सदर गुन्हयात वापरलेली पांढरे रंगाची आय- २० कार ही संतोष लक्ष्मण भंडलकर( रा. उमाजी नाईक चोक, एसटी स्टेंड शेजारी, पणदरे ता. बारामती) हा वापरत असून त्याने त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने सदरचा गुन्हा केला आहे,अशी बातमी मिळाली.
हेही वाचा: खळबळजनक ! महाविद्यालयाच्या आवारातच विद्यार्थ्याचा खून; कोयत्याने केले सपासप वार
संशयित आरोपी संतोष भंडलकर याचा शोध घेण्यास सुरूवात केली असता, संतोष भंडलकर हा त्याचेकडील आय-२० कारने त्याचे इतर साथीदारांसह सोलापूर बाजूकडे जात असल्याची बातमी मिळाली, तांत्रिक विश्लेषणा द्वारे तातडीने नियोजन करून सोलापूर हायवे लगत हिंगणगाव परिसरात सापळा रचून आरोपी संतोष लक्ष्मण भंडलकर याच्यासह सुरेश अशोक राखपसरे(वय ३३ वर्षे, रा. के. के. घुले विदयालय समोर, कुंजीर वस्ती, मांजरी ता. हवेली) असे त्यांचेकडील पांढरे रंगाची आय-२० कार( नं. एम.एच. १२ जी.व्ही. ८३८३) या वाहनासह मिळून आले. त्यांच्याकडे अधिक चौकशीमध्ये त्यांनी सदरचा गुन्हा इतर साथीदार शेखर सुभाष शिंदे,( रा. सांगवी, ता. बारामती), सुरज शंकर मदने( सध्या रा. माळेगाव ता. बारामती,) हरीभाऊ बबन खुडे, अशोक गणपत बनसोडे( दोघे रा. के.के. घुले विदद्यालय जवळ, कुंजीर वस्ती, मांजरी ता. हवेली) यांनी मिळून संगणमताने केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. इतर आरोपींचा शोध घेतला असता, आरोपी शेखर सुभाष शिंदे यास सांगवी परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून चारचाकी कार व गुन्हयात वापरलेली एकूण दोन गावठी पिस्टल व आठ जिवंत काडतूस असा एकूण २,५१,६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
आरोपींना विश्वासात घेवून सोलापूर कडे जाणेबाबत चौकशी केली असता, सांगोला जत मार्गावरील शेगाव गावातील सोनार व्यावसायिकास लुटणार असल्याची माहिती मिळाली असून यातील आरोपी सुरज मदने याने ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा केलेला असल्याची माहिती मिळाली असून त्याच्या राहते घरासमोर एक ट्रॅक्टर मिळून आला. सदर ट्रॅक्टर मालकाचा शोध घेण्यात येत असून सदरचा ट्रॅक्टर कोठून चोरी झला आहे याबाबत तपास चालू आहे.