ओव्हरलोड वाहनांवर पोलिसांची कारवाई
बारामती शहरातील खंडोबा नगर या ठिकाणी रविवारी झालेल्या भीषण अपघातात इतिहास सह दोन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने बारामती परिसरातील बेफिकीरपणे अवजड वाहने चालवणाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या संदर्भात समाज माध्यमांवर देखील तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून या कारवाईचे स्वागत बारामती शहरातील नागरिकांनी केले आहे.
बारामती परिसरात मोठ्या प्रमाणावर खडी, मुरूम व इतर बांधकाम साहित्याची वाहतूक ट्रकमधून होत असते. मात्र, या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वजन भरले जात असल्याने रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, तसेच अपघात ही होत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करत पोलिसांनी ही कठोर कारवाई केली आहे. जप्त केलेली वाहने २ ते १० टनांपर्यंत ओव्हरलोड आढळून आली आहेत. यामध्ये प्रत्येक वाहनावर मोठा दंड होण्याची शक्यता आहे. सर्व वाहने बारामती वाहतूक शाखेच्या कार्यालयात ठेवण्यात आली आहेत. पोलीस प्रशासनाने सर्व वाहनचालकांना याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले असून, यापुढेही अशाच प्रकारची कारवाई सातत्याने राबवली जाणार असल्याचा इशारा दिला आहे.