शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण करत काढायला लावल्या उठाबशा; शिरूर तालुक्यात घडला खळबळजनक प्रकार (फोटो - istockphoto/टीम नवराष्ट्र)
शिक्रापूर : शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा कर्मचारी जेसीबीच्या सहाय्याने पाणीपुरवठ्यासाठी चारी खोदत होते. त्यावेळी कर्मचारी व जेसीबी चालकाला मारहाणही केली. शासकीय कामात अडथळा आणून सदर कर्मचाऱ्याला सोसायटीच्या प्रत्येक घरासमोर उठाबशा काढायला लावल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. ही घटना शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
अमित जयंत डोंगरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा कर्मचारी अंकुश कुऱ्हाडे हे श्रीनिवास सोसायटी समोर जेसीबीच्या सहाय्याने पाणीपुरवठ्यासाठी चारी खोदत असताना अनीत डोंगरे तेथे आला. त्याने कुऱ्हाडे यांना ‘माझ्या घराच्या पार्किंगच्या समोरचे पाईपचे काम का केले नाही? असे म्हणून दमदाटी करत जेसीबी चालक नाथा शिंदे व अंकुश कुऱ्हाडे यांना दगडाने मारहाण करत जखमी केले. यावेळी अमित याने कुऱ्हाडे यांच्या ताब्यातील (एमएच १२ सीझेड ९६२३) या दुचाकीचे देखील नुकसान करत शासकीय कामात अडथळा आणला.
यावेळी अमित डोंगरे हा एवढ्यावर न थांबता त्याने ग्रामपंचायत कर्मचारी कुऱ्हाडे यांना दमदाटी करत सोसायटीतील प्रत्येक घरासमोर उठाबशा काढायला लावल्या. दरम्यान, या घडलेल्या प्रकाराबाबत शिरुर ग्रामीणचे ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी अंकुश माणिक कुऱ्हाडे (वय ४१ वर्षे रा. रामलिंग रोड शिरुर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलिसांत फिर्याद दिली.
पोलिसांनी अमित जयंत डोंगरे (रा. श्रीनिवास सोसायटी रामलिंग रोड शिरुर ता. शिरुर जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार राऊत हे करत आहे.