तज्ञ डॉक्टरांच्या बनावट सहीचा तपासणी अहवाल देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
कराड : शहराच्या भेदा चौकातील एका लॅबोरटरीमध्ये रक्त, लघवीच्या तापसणी, त्यातील तज्ज्ञ डॉक्टरांशिवाय होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यात नवी मुंबई, पुणे, कोल्हापूरसह कराडच्या 17 जणांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. मेट्रो पोलिस हेल्थ केअर लिमिटेड असे या लॅबोरटरीचे नाव आहे. याठिकाणी तपासणीला आलेल्या रक्त-लघवीच्या तपासणी अहवालावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या डिजिटल स्वाक्षरी वापरून ते लोकांना देऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली जात होती. त्या टोळीचा पर्दाफाश करत 17 संशयितांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यात दोन डॉक्टरांसह लॅब चालवणाऱ्यांचाही समावेश आहे.
याबाबत पॅथॉलॉजिस्ट डॉ. संदिप यादव यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करत त्या लॅबवरही कारवाई केली. त्यामुळे कराड शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बनावट अहवाल देण्याच्या लॅबच्या प्रकरणात डॉ. सुशील शहा व डॉ. स्मीत सुडके (दोघेही रा. पुणे), अमिरा सुशील शहा व विवेक गंभीर, संजय भटनागर, मिलींद सरवदे, अनिता रामचंद्रन, हेमंत सचदेव व कमलेश कुलकर्णी (सर्व, रा. नवी मुंबई), विनायक दंताल (रा. कोल्हापूर), विद्याधर भागवत (सर्व रा. कराड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हेदेखील वाचा : Jharkhand Crime: जेवणावरून वाद आणि…, झारखंडमध्ये पत्नीचा साडीने गळा आवळून केली हत्या; नेमकं काय घडलं?
शहरातील भेदा चौकात मेट्रो पोलीस हेल्थ केअर लिमिटेड नावाने फेब्रुवारी २०२३ पासून लॅबोरटरी कार्यरत होती. तेथे रुग्णाचे रक्त, लघवीचे नमुने घेतले जात होते. त्यांच्या चाचण्या करुन त्याचा अहवाल दिला जात होता. तो अहवाल त्यातील तज्ज्ञ डॉ. स्मिता सुडके यांच्या नावाने दिला जात होता. मात्र, त्यांची स्कॅन केलेली स्वाक्षरी, नाव व शैक्षणिक पात्रता याचा वापर केला जात होता.
डॉ. सुडके पॅथोलॉजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक आहेत. मात्र, त्या येथील मेट्रो पोलीस हेल्थ केअरमध्ये स्वत: हजर न राहता त्यांच्या अनुपस्थितीत तेथील तंत्रज्ञ व अन्य व्यक्ती स्वतः चाचणी अहवाल तयार करुन देत होते. त्यावर डॉ. सुडके यांचे नाव व सही छापलेली असल्याचे माझ्याही निदर्शनास आले होते.
दरम्यान, ओळखीचे अभिजीत महाडिक (रा. चिंचणी अंबक, ता. कडेगाव) हे जुलै २०२३ मध्ये तपासणीसाठी माझ्याकडे आले होते. त्यावेळी त्यांनी, यापूर्वी रक्त लघवीचा नमुना ३० जून २०२३ व 4 जुलै २०२३ रोजी तपासलेला मेट्रो पोलीस हेल्थ केअर लिमिटेड येथील डॉ. स्मिता सुडके यांची सही असलेला रिपोर्ट दिला. त्यावेळी महाडिक यांनी डॉक्टरांना भेटण्याची विनंती केली असता महाडिक यांनी डॉ. सुडके पुण्यात असतात, असे त्यांना सांगितले. त्याऐवजी भागवत आल्यानंतर अहवाल समजावून देतील, असे सांगितले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लॅबरोटरीचे अहवाल फक्त पॅथोलॉजी विषयात पदव्युत्तर असलेल्या मेडीकल कौन्सिलशी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाने प्रती स्वाक्षरीत करणे बंधनकारक असताना, ते दिल्याने वैद्यकीय परिषदेशी नोंदणीकृत नसणाऱ्या व्यक्तीने वैद्यक व्यवसाय करणे गुन्हा ठरला. त्यामुळे जबाबदार पॅंथोलॉजीस्ट नात्याने त्याची तक्रार मेट्रो पोलीस हेल्थ केअर लिमिटेडचे संचालक व स्टाफच्या विरूध्द लेखी तक्रारी अर्ज दिला होता.
त्या अर्जानुसार पोलिसांनी मेडीकल कौन्सील मुबंई व अन्य संबधीत विभागाचा अभिप्राय घेऊन दखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार येथील मेट्रो पोलीस हेल्थ केअर लिमिटेडसह कंपनीचे संचालक डॉ. सुशील शहा, संचालक अमिरा सुशील शहा, विवेक गंभीर, संजय भटनागर, मिलींद सरवदे, अनिता रामचंद्रन, हेमंत सचदेव, कमलेश कुलकर्णी, व्यवस्थापक विनायक दंताल, येथील शाखेचे भागिदार विद्याधर भागवत, डॉ. स्मिता सुडके, लॅबारोटरीत काम करणारे तत्रज्ञ व कर्मचारी यांनी आर्थिक फायद्यासाठी लोकांची फसवणुक केली आहे.
विद्याधर भागवत, प्रविण कांबळे, सुषमा चव्हाण, अनिल जाधव, योगिनी व्यास, सतिश जाधव, सचिन मोरे यांनी पॅथोलॉजीस्ट प्रत्यक्षात हजर नसताना त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या स्वाक्षरीचे अहवाल तयार केले आहेत. त्यावर डॉ. सुडके यांची स्कॅन केलेली स्वाक्षरी छापली आहे. त्यानुसार कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.






