सौजन्य - नवराष्ट्र टीम
लातूर : देशभर गाजत असलेल्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट लातूरपर्यंत पोहोचल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच गुरुवारी सीबीआयच्या पथकाने लातूर शहरात धडक देत एका निवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेतल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. “लातूर पॅटर्न”ची ओळख असलेल्या शहरात या कारवाईमुळे मोठी खदखद निर्माण झाली असून विद्यार्थी, पालक आणि खासगी शिकवणी क्षेत्रात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर लातूरमध्ये सीबीआय दाखल झाल्याच्या चर्चा रंगत होत्या. काही माध्यमांमध्येही नीट पेपरफुटी प्रकरणातील चौकशीची धागेदोरे पुणे आणि लातूरपर्यंत पोहोचल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. अखेर गुरुवारी सीबीआयच्या पथकाने कारवाई करत एका सेवानिवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आल्याने चर्चांना अधिकच उधाण आले आहे.
“आता पुढे काय?” पालकांनी उपस्थित केला प्रश्न
सूत्रांच्या माहितीनुसार, नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात खासगी शिकवणी क्षेत्राशी संबंधित काही व्यक्तींची चौकशी करण्यात येत होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची अधिकृत ओळख किंवा नेमक्या आरोपांबाबत प्रशासन आणि तपास यंत्रणांकडून अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. लातूर हे राज्यातील महत्त्वाचे शिक्षण केंद्र मानले जाते. वैद्यकीय आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी राज्यभरातून विद्यार्थी येथे दाखल होत असतात. अशा परिस्थितीत नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे नाव समोर आल्याने शहराच्या शैक्षणिक प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून “आता पुढे काय?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हे सुद्धा वाचा : मनसेच्या नेत्याचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; रुग्णालयात केलं दाखल
नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यात मोठी कारवाई
नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासादरम्यान पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारे नावाच्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. अहिल्यानगरमध्ये अटक करण्यात आलेल्या धनंजय लोखंडेला मदत केल्याचा तिच्यावर आरोप आहे. तपासात असे उघड झाले आहे की, मनीषा विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना मुख्य एजंट धनंजय लोखंडेकडे पाठवत असे. या कारवाईनंतर पेपरफुटी रॅकेटमधील अनेक छुपे व्यक्ती समोर आले आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सीबीआयने तपासादरम्यान महत्त्वपूर्ण पुरावे उघड केले, ज्याच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली.






