उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या एका कॉलेज कॅम्पसमधून विद्यार्थी दादागिरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका विध्यार्थ्याला सहकाऱ्यांनी एका कारमध्ये बसवून बेदम मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या मारहाणीचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. यात एक मुलगी ‘हात खाली कर’ असे ओरडत विद्यार्थ्याला सतत थप्पड मारताना दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विध्यार्थी शिखर मुकेश केसरवानी हा बीए एलएलबीच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. तो २६ ऑगस्ट रोजी आपल्या मैत्रिणीसोबत गाडीतून कॉलेजला गेला होता. कॉलेजच्या पार्किंगमध्ये काही आरोपींना त्याला अडवले आणि त्याच्याशी बोलण्याच्या बहाण्याने गाडीत प्रवेश केला. जवळपास ४५ मिनिटे त्यांनी शिखरला शिवीगाळ करत धमकावले. या प्रकारामुळे शिखर सध्या मानसिक धक्क्यात आहे. तो आता कॉलेजला जात नाहीय, अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली.
A video of an Amity University law student in UP’s Lucknow being slapped by classmates atleast 26 times in over a minute has surfaced on social media. The trigger behind this incident is yet to be ascertained. pic.twitter.com/FssBFAvEuT
— Piyush Rai (@Benarasiyaa) September 5, 2025
व्हिडिओत काय?
व्हिडिओमध्ये एक विद्यार्थिनी शिखरच्या डाव्या गालावर सतत थप्पड मारत असल्याचे दिसत आहे. त्यावेळी तो बचाव करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला ‘हात खाली कर’ असे धमकावले जाते. बाजूला बसलेला एक विद्यार्थी त्याच्या उजव्या हाताला हिसका देऊन त्याला एक ठोसा मारतो. त्यांनतर तो देखील त्याला खूप मारतो.
वडिलांना देखील धमकावले
वडील मुकेश केसरवानी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा नुकताच एका शस्त्रक्रियेतून बरा झाला होता. आरोपी जाह्नवी मिश्रा आणि आयुष यादव यांनी त्याला 50-60 थप्पड मारल्या, तर विवेक सिंग आणि मिलय बॅनर्जी यांनी मारहाणीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो व्हायरल केला. इतकंच नाही तर आरोपी विद्यार्थ्यांनी शिखरचा फोन देखील तोडला. तसंच मुकेश यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनाही धमकावण्यात आले.
मुकेश यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आयुष यादव, जाह्नवी मिश्रा, मिलय बॅनर्जी, विवेक सिंग आणि आर्यमन शुक्ला या 5 विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना अॅमिटी युनिव्हर्सिटी येथे घडली. अॅमिटी युनिव्हर्सिटीने या प्रकरणी अद्याप कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कॉलेजमध्ये रॅगिंग किंवा विद्यार्थ्यांची दादागिरी हे विद्यार्थी आयुष्यावर मोठा परिणाम करणाऱ्या घटना आहेत. अनेकदा कॉलेजच्या प्राध्यापकांकडे तक्रार केल्यावर देखील काही कार्यवाही होत नाही. यादादागिरी आणि रॅगिंगमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आपला आयुष्य संपवलं आहे. आता उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या घटनेननंतर विध्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Haryana Crime: नवऱ्याने पत्नीला शिकवण्यासाठी आपली लायब्ररी विकली, ती पोलीस झाली आणि तिने…