संग्रहित फोटो
बारामती : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहे. खून, खुनाचा प्रयत्न, हाणामाऱ्या, लुटमार यासारख्या घटना दररोज उघडकीस येत असतात. अशातच आता दौंड तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दौंड तालुक्यातील वासुंदे येथील गावकामगार तलाठी बाळासाहेब हरिश्चंद्र चव्हाण यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी बारामती जिल्हा सत्र न्यायालयाने दोन आरोपींना दोषी ठरवले आहे. आरोपींना दोन वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी ५,००० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
किरण लक्ष्मण खराडे आणि आकाश कैलास ताकवणे (दोघेही रा. हिंगणीगाडा) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. ४ जानेवारी २०२३ रोजी तलाठी बाळासाहेब चव्हाण हे शासकीय कामानिमित्त पाटस येथील मंडल अधिकारी कार्यालयाकडे जात असताना बसस्थानकाजवळ आरोपी किरण खराडे व आकाश ताकवणे यांनी त्यांना अडवून मारहाण केली. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाटस पोलीस चौकीचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी आरोपींविरुद्ध बारामती जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. जिल्हा न्यायाधीश हितेंद्र वाणी यांनी सोमवारी (दि. ८ सप्टेंबर) निकाल देत आरोपींना दोषी ठरवले.
मारहाणीप्रकरणी दोन्ही आरोपींना दोन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी ५,००० रुपये दंड, धमकी दिल्याप्रकरणी किरण खराडे याला एक वर्षे सश्रम कारावास व २,००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड विकास घनवट यांनी काम पाहिले. फिर्यादी, पंच, साक्षीदार व तपास अधिकारी यांच्या साक्षी निर्णायक ठरल्या. घनवट यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली. या खटल्यात पोलीस उपनिरीक्षक गोरख कसपटे आणि हवालदार वेनूनाद ढोपरे यांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले.
पोटच्या मुलानेच आईवर केले चाकूने सपासप वार
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शनिवार पेठेत कौटुंबिक वादातून मुलानेच आपल्या ८० वर्षीय आईवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विसर्जन सोहळा सुरू असताना शनिवार पेठेतील मेहुणपुरा परिसरात ही घटना रात्री घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी ४५ वर्षीय मुलाला आईचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली आहे. अविनाश पांडुरंग साप्ते (वय ४५, रा. मेहुणपुरा, शनिवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कुसुम साप्ते (वय ८०) असे गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.