संग्रहित फोटो
पुणे : सायबर गुन्ह्यात ‘डिजीटल ॲरेस्ट’च्या भितीने अनेकांना गंडविले जात असतानाच पुणे पोलिसांच्या सायबर सेलने एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल सव्वा कोटींना गंडा घालणाऱ्या सायबर चोराला अटक करण्यात यश मिळविले आहे. या चोरट्याला पनवेलमधून पकडण्यात आले आहे. त्याच्याकडून भारतातील पाच गुन्ह्यांची उकल झाली आहे.
तुषार हरिश्चंद्र वाजंत्री (वय २८, रा. मु. पो. कोकबन, ता. रोह, जि. रायगड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत ७८ वर्षीय व्यक्तीने सायबर पोलिसांत तक्रार दिली होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस अंमलदार राजुदास चव्हाण व त्यांच्या पथकाने केली आहे.
गेल्या वर्षी ( नोव्हेंबर २०२४) अवघ्या दहा दिवसात तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाकडून डिजीटल ॲरेस्टच्या माध्यमातून या सायबर चोरट्याने ६ कोटी २९ लाख रुपये उकळले होते. तक्रारदारांना व्हॉट्सअप कॉल करून पोलीस असल्याची बतावणी केली होती. त्यांना मनी लाँड्रींगच्या गुन्ह्यात तुमचे नाव आले असून, तुम्हाला याप्रकरणात ‘डिजीटल ॲरेस्ट’ करण्यात येत असल्याचे सांगत घरातील एका खोलीत डांबून राहण्यास भाग पाडले होते. त्यानंतर या गुन्ह्यातून सुटण्यासाठी व वेगवेगळ्या कारणांसाठी त्यांना पैसे पाठविण्यास भाग पाडले होते. फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता.
गुन्ह्याचा तपास करताना पैसे वेगवेगळ्या खात्यावर गेल्याचे निष्पन्न झाले. तर धावीर कन्स्ट्रक्शनवर खात्यावर गेल्याचेही दिसून आले. हे खाते रायगड जिल्ह्यातील वाजंत्री याचे असल्याचे लक्षात आले. तर, वाजंत्री याना नुकतेच ९० व २० लाख रुपये आले होते. त्याने ९० लाख व २० लाख रुपयांच्या एफडी केल्या होत्या. त्यानूसार पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. पण, पोलीस मागावर असल्याचे समजताच तो राजगडमधून फरार झाला.
नंतर तांत्रिक तपासावरून त्याला पनवेलमधील एका रिसोर्टमधून पकडण्यात आले. न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनवली असून, प्राथमिक तपासात त्याने अशा पद्धतीने वेगेवगळ्या राज्यातील ५ नागरिकांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक केली आहे. या गुन्ह्यातील त्याचे साथीदार पसार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.