संग्रहित फोटो
पुणे : मुकूंदनगर तसेच बिबवेवाडीतील दोन तरुणांना सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणूकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने तब्बल ६६ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांकडून वारंवार आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले जात असताना शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने फसवणूक करण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचे दिसत आहे.
याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात २९ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. त्यानूसार, मोबाईल धारक व्यक्तींविरोधात आयटी अॅक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार एप्रिल ते २२ मे २०२५ या कालावधीत घडला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे नोकरदार असून, त्यांना ३ महिन्यांपुर्वी (एप्रिल २०२५) सोशल मिडीयाच्या माध्यमातून जादा परतावा देण्याचे आमिष दाखविले. विश्वास मिळविण्यासाठी चोरट्यांनी तरुणाला प्रथम काही परतावा देखील दिला. नंतर मात्र, त्यांच्याकडून वेळोवेळी एकूण २५ लाख ३० हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. परंतु, नंतर त्यांना परतावा किंवा मुळ रक्कम न देता फसवणूक केली.
दुसऱ्या घटनेत ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी तब्बल ३६ लाख ६७ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. त्यांनाही अशाच प्रकारे चोरट्यांनी शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणूक करण्यास भाग पाडले. परंतु, पैसे घेतल्यानंतर त्यांना परतावा किंवा मुळ मुद्दल न देता त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. मार्च २०२३ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला आहे.
हे सुद्धा वाचा : कानाखाली मारल्याच्या राग अनावर; लोखंडी हत्याराने सपासप वार करून तरुणाला संपवल
गुंतवणुकीवर नफा देण्याच्या बहाण्याने एकाची फसवणूक
आमच्याकडे सरकारी टेंडर घेण्याचा परवाना आहे. त्यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो, असे सांगत एका व्यक्तीची दोघांनी ३ कोटी ९ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी मोहित ढाकण (रा. मुंबई) यांनी मार्केटयार्ड पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिासांनी करण दिलीप बोथरा, सोम्या करण बोथरा (रा.सॅलीसबरी पार्क) या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत घडला आहे.