'ती' कॉलर ट्यून ठरतीये फायद्याची; 'डिजिटल अरेस्ट'च्या प्रकरणांमध्ये दोन महिन्यांत झाली घट (Photo Credit- Social Media)
पुणे : सध्या टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यानुसार, ऑनलाईन व्यवहारही केले जात आहेत. यामुळे आता काही खबरदारीही घेणे गरजेचे बनत आहे. त्यात ‘डिजिटल अरेस्ट’च्या प्रकरणांमध्ये वाढ होत होती. मात्र, फोन करताना सध्या जी कॉलर ट्यून सुरु आहे ती फायद्याची ठरत आहे. कारण, गेल्या दोन महिन्यांत ‘डिजिटल अरेस्ट’च्या प्रकरणांमध्ये घट झाली आहे.
‘डिजिटल अरेस्ट’ हा एक सायबर स्कॅम आहे. डिजिटल अरेस्टमध्ये कॉल करणारे आत्मविश्वासाने बोलतात, कधीकधी ते पोलिस, सीबीआय, नार्कोटिक्स, आरबीआय आणि दिल्ली किंवा मुंबई पोलिस अधिकारी असल्याचे भासवतात. जेव्हा तुम्ही व्हॉट्सऍप किंवा स्काईप कॉलवर कनेक्ट होता, तेव्हा ते बनावट अधिकारी तुम्हाला पूर्णपणे खरे वाटतात. ते पीडित व्यक्तीचा भावनिक आणि मानसिक छळ करतात. ते खात्री देतात की, त्यांच्यासोबत किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत काहीतरी वाईट घडले आहे किंवा घडणार आहे. समोर बसलेला माणूस पोलिसांच्या गणवेशात आहे, अशा परिस्थितीत बहुतेक लोक घाबरतात आणि त्यांच्या जाळ्यात अडकतात.
डिजिटल अटक कशी ओळखावी?
डिजिटल अटक ओळखण्यासाठी दक्षता आवश्यक आहे. जर तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरून फोन किंवा व्हॉट्सऍप कॉल आला तर तो घेताना पोलिसांचा सल्ला लक्षात ठेवा.
– पोलिस अधिकारी कधीही त्यांची ओळख उघड करण्यासाठी व्हिडिओ कॉल करणार नाहीत.
– पोलिस अधिकारी तुम्हाला कधीही कोणतेही अॅप डाउनलोड करण्यास सांगणार नाहीत.
– ओळखपत्र, एफआयआरची प्रत आणि अटक वॉरंट ऑनलाइन शेअर केले जाणार नाहीत.
– पोलिस अधिकारी कधीही व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉलद्वारे जबाब नोंदवत नाहीत. कॉलदरम्यान पोलिस अधिकारी तुम्हाला धमकावत नाहीत किंवा पैसे किंवा वैयक्तिक माहिती देण्यास भाग पाडत नाहीत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत घट
सप्टेंबर ते डिसेंबर 2024 च्या तुलनेत जानेवारी व फेब्रुवारी 2025 या दोन महिन्यांमध्ये डिजिटल अरेस्टच्या भीतीमध्ये व पर्यायाने गुन्ह्यांत घट झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.