कर्जत /संतोष पेरणे : कर्जत तालुक्यात पोलीसांनी छापेमारी केली असून ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. तालुक्यातील किकवी या गावात असलेल्या सावली फार्म हाऊसमध्ये ड्रग बनविण्याचा कारखाना अंमली पदार्थ शाखेने उध्वस्त केला आहे. या सगळ्या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या फार्महाऊसमधील तब्बल 24 कोटींचे ड्रग ताब्यात घेतले असून सहा जणांना अटक केली आहे. आर.सी.एफ. पोलीस ठाणे इथे अंमली पदार्थां बाबत गुन्हा नोंदवला असून सापळा रचत हा सगळा प्रकार उघडकीस आणला आहे.
आर.सी.एफ. पोलीस ठाणे इथे अंमली पदार्थां बाबतच्या गुन्हयातील अटक आरोपीताकडे आमच्या तपासी पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून “सावली फार्म हाउस, किकवी, कर्जत, या ठिकाणी शेळी पालन व्यवसाय करीत असल्याचे भासवून त्यामागे अंमली पदार्थ निर्मिती करण्याचा कारखाना चालू केला असल्याचे निष्पन्न झाले होते.
सदर ठिकाणी उत्पादन करणा-या टोळीपैकी एका इसमास अटक करून तो त्याचे साथीदारांचे मदतीने चालवित असलेल्या फॅक्टरी मधून 11 कोटी किंमतीचा एकूण 5 किलो 525 ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) व अंदाजे एक कोटी- किंमतीचा अंमली पदार्थाची निर्मिती करीता लागणारा कच्चा माल व इलेक्ट्रॉनिक प्लॅन्टचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
या गुन्हयात अदयापपर्यंत 24 कोटी किमतीचा एकुण 12किलो 664 ग्रॅम वजनाचा एम.डी (मेफेड्रोन) व अंदाजे एक कोटी किमतीचा अंमली पदार्थाची निर्मिती करीता लागणारा कच्चा माल व इलेक्ट्रॉनिक प्लॅन्टचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून अंमली पदार्थाची विक्री करणारे पाच आरोपी व उत्पादन करणारा टोळीमधील एक असे एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आले आहे.