संग्रहित फोटो
पुणे / अक्षय फाटक : जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, तबल २५ कोटींच्या जवळपास साडे दहा किलो मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त केला आहे. धक्कादायक म्हणजे या ड्रग्ज प्रकरणात अहिल्यानगर पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याला देखील पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडले आहे. आरोपींच्या संपर्कात असल्यावरून त्याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या कारवाईने पोलिस दलासह राज्यभरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून, आणखी काही धागेदोरे हाती लागले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शिरूर शहरात एकाकडून ड्रग्जची विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली. या माहितीनंतर पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांचे पथक तयार करून एकत्रित कारवाई केली. एकाला पकडून त्यांच्याकडून प्रथम 1 किलो मेफेड्रोन पकडले होते. पुढच्या तपासात आणखी माहिती समोर आली. पुन्हा दोन जणांना पकडत तबल साडे नऊ किलो मेफेड्रोन पकडण्यात आले. या तिघांकडून पुढील रॅकेट देखील समोर आले. त्याचवेळी आहिल्यानगर पोलिस दलातील एक पोलिस अंमलदार आरोपींच्या सातत्याने संपर्कात असल्याचे दिसून आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत पोलिसांनी चौघांना पकडत साडे दहा किलो मेफेड्रोन आणि इतर साहित्य असा जवळपास 25 कोटींचा मुद्देमाल जप्त केला असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेदेखील वाचा : Chhatrapati Sambhajinagar Crime: मोठी कारवाई! संभाजीनगरमध्ये ६१ ग्रॅम एमडीसह तिघांना अटक; तर ‘इतक्या’ लाखाचा ऐवज जप्त
पुण्यात गेल्या वर्षी पुणे पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले होते. त्यावेळी रांजणगाव एमआयडीसी भागातील एका कारखान्यात उच्च दर्जाचे मेफेड्रोन पकडण्यात आले होते. जवळपास ३६०० कोटींचे मेफेड्रोन पकडले गेले होते. त्यानंतर पुणे ड्रग्जच्या विळख्यात गेल्याचे प्रकर्षाने दिसून आले होते. पोलिसांनी या कारवाईनंतर शहरासह वेगवेगळ्या राज्यात व शहरात देखील छापेमारी केली होती.
दरम्यान, आता जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात ड्रग्ज रॅकेट चालवले जात असल्याचे या एका कारवाईवरून समोर आले आहे. शिरूर शहरात ही कारवाई करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : Crime News: कोकण टास्क फोर्सची धडक कारवाई; तब्बल 55 कोटी 88 लाखांचे ड्रग्स केले उद्ध्वस्त






